Maharashtra Assembly Election Result: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल काहीच वेळात जाहीर होणार आहे. राज्यातील सत्तेच्या चाव्या महायुती की महाविकास आघाडीकडे जाणार हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे. 2019च्या निकालाचा विचार केल्यास भाजप मोठा भाऊ ठरला होता. 2019ची निवडणूक भाजप-शिवसेना यांनी एकत्रित लढवली होती. मात्र, मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरुन तणाव निर्माण झाला आणि युती फिस्कटली. त्यानंतर राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी महाविकास आघाडी साकार झाली. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले मात्र अडीच वर्षांतच सरकार कोसळले आणि भाजप पुन्हा सत्तेत आली. 2019 मधील पक्षीय बलाबल आणि नाट्यमय घडामोडींचा आढावा.
21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान पार पडले होते तर 24 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर झाला होता. 2019 मध्ये भाजपने 164 जागेवर उमेदवार उभे केले होते. तर, शिवसेनेने 124 जागां लढवल्या होत्या. त्याचबरोबर काँग्रेसने 147 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 121 जागांवर उमेदवार उभे केले होते.
पक्ष 2019 मध्ये जिंकलेल्या जागा
भाजप - 105
शिवसेना - 56
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - 54
काँग्रेस - 44
अपक्ष- 13
बहुजन विकास आघाडीचे तीन एमआयएम, प्रहार जनशक्ती पक्ष आणि समाजवादी पक्षाने प्रत्येकी दोन जागांवर विजय मिळवला होता. स्वाभिमानी पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, मनसे, क्रांतिकारी शेतकरी पक्ष, जन सुराज्य शक्ती आणि मार्क्सवादी कम्युनिटी पक्षाने प्रत्येकी एक जागा जिंकली होती.
2019च्या विधानसभेत भाजपला बहुमताचा आकडा गाठता आला नव्हता. त्यामुळं शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरण्यात आला होता. मात्र, भाजपकडून शिवसेनेचा हा आग्रह मान्य करण्यात येत नव्हता. त्यामुळं राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. राज्यात शरद पवारांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी साकारली गेली. 28 नोव्हेंबर 2019 रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र अडीच वर्षांतच हे सरकार कोसळले. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपसोबत सरकार स्थापन केले.
2022 साली जून महिन्यात विधानपरिषदेच्या निवडणुका पार पडताच एकनाथ शिंदे हे काही शिवसेना आमदारांना घेऊन सूरतला गेले. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 आमदारांचा पाठिंबा होता. त्यामुळं महाविकास आघाडी सरकार पडले. 30 जून 2022 रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर 2 जुलै 2023 साली अजित पवारांनी देखील बंडखोरी करत महायुतीत सामील झाले. अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले. 2024च्या निवडणुकीत महायुती म्हणून तिन्ही पक्ष रिंगणात उतरले आहेत.
महायुती
भाजप- 105
शिवसेना (शिंदे)- 40
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार)- 41
महाविकास आघाडी
काँग्रेस-44
शिवसेना (ठाकरे)-14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार)- 14