Maharashtra Assembly Election: राज्यामध्ये आचारसंहिता लागू असल्याने ठिकाठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोख रक्कमेबरोबरच सोनं आणि चांदी सापडली आहे. असं असतानाच पुणे-बंगळुरु महामार्गावर जवळपास साडेपाच कोटी रुपयांचं सोनं आणि चांदी सापडली आहे. महाराष्ट्रामधील एका बड्या सोन्याच्या व्यापाऱ्याच्या मालकीचे हे मौल्यवान धातू असल्याची माहिती मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच अशापद्धतीने सोनं असलेलं कंटेनर पोलिसांनी पकडलं होतं.
समोर आलेल्या माहितीनुसार, पुणे-बंगळुरु महामार्गावरील तासवडे टोल नाक्यावर 4 कोटी 90 लाख रुपयांचं सोनं आणि 57 लाख रुपयांची चांदी सापडली आहे. महाराष्ट्रामधील एका बड्या सोन्या चांदीच्या व्यापाऱ्याच्या मालकीचं हे मौल्यवान धातू असल्याची माहिती मिळत आहे. तळबीड पोलीस ठाण्यात आरटीओ, आयकर विभागाबरोबरच कराड तहसीलदारांची टीम घटनास्थळी हजर झाली आहे. सध्या या सोन्याची तस्करी होती की कोणा व्यापाऱ्याचे आहे याबाबत तळबीड पोलीस तपास करत आहेत.
25 ऑक्टोबर रोजी पुण्यातील सहकार नगर येथे पोलिसांनी एमएच 02 ईआर 8112 या कंटेनरला तपासणीसाठी थांबवलं असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोनं आढळून आलं. तपासणीदरम्यान पांढऱ्या रंगाच्या सदर कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणात सोनं असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. या कंटेनरमधील सोन्याची एकूण किंमत 138 कोटी रुपये इतकी असल्याची माहिती समोर आली. नियमित नाकाबंदीदरम्यान सदर सोन्याचा कंटेनर थांबवून तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान पोलिसांनी या सोन्याच्या वाहतुकीचा परवाना मागितला असता चालकाकडे आणि त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तीकडे रितसर कागदपत्रं होती. हे एवढं सोन डिलिव्हरी ट्रान्सपोर्टचे होते अशी माहिती पोलीस तपासामध्ये समोर आली.
24 ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आलेल्या एका पत्रकानुसार 15 ऑक्टोबरपासून राज्याच आचारसंहित लागू झाली असून वेगवेगळ्या यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान बेकायदा पैसे, दारु, अमली पदार्थ, मौल्यवान धातू या माध्यमातून 15 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबरदरम्यान एकूण 90 कोटी 74 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. मागील 24 तासामध्ये म्हणजेच 23 ऑक्टोबर रोजी 52 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. यापैकी आयकर विभागाने 30 कोटी 93 लाख रुपये, अबकारी विभाग 8 कोटी 30 लाख रुपये, राज्य पोलीस विभाग 8 कोटी 10 लाख रुपये, अंमली पदार्थ विभाग अडीच कोटी, राज्य उत्पादन शुल्क विभाग 1 कोटी 75 लाख रुपये आणि कस्टम विभागाने 72 लाखांची रक्कम जप्त केली आहे.
नागपूर, मुंबई उपनगर, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कारवाया करण्यात आल्या. या प्रकरणांमध्ये सखोल चौकशी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.