Mumbai University On Electoral literacy: आगामी विधानसभा निवडणूक 2024 या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये निवडणूक साक्षरता व्हावी याकरिता मुंबई विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. या अनुषंगाने विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागामार्फत (DLLE) अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. विभागामार्फत विविध महाविद्यालयांच्या सहकार्याने निवडणूक साक्षरता उपक्रमांची मालिका सुरु करण्यात आली आहे. ज्यामध्ये ऑनलाईन मतदार नोंदणी, मतदार जागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण, इलेक्टोरल लिटरसी क्लबची स्थापना, मतदानाची शपथ व ईव्हीएम व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक, आणि मतदान जनजागृती करिता व्यापक उपक्रमांचा यात समावेश आहे.
निवडणूक साक्षरतेच्या अनुषंगाने युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन (USISE), ऑल इंडिया सर्वे फॉर एज्युकेशन (AISHE) आणि अन्य डेटाबेस सहाय्याने महाविद्यालयातील अठरा वर्ष पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची नोंद घेऊन पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाइन मतदार नोंदणी करण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन करून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत व दाखल झालेले अर्ज पुढील कार्यवाहीकरिता शासनाकडे सुपूर्त करण्यात येत आहेत.
नवीन भावी मतदारांना देशाच्या निवडणूक व्यवस्थेची पूर्णपणे परिचित करण्यासाठी त्याचबरोबर त्यांच्यामध्ये मतदार जागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. हे कार्यक्रम मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात घेण्यात येत आहेत व या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढीस लागलेला आहे.
महाविद्यालयांमध्ये इलेक्टोरल लिटरसी क्लबचे उपक्रम आयोजित करण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या परिपत्रकाला प्रतिसाद म्हणून आतापर्यंत विविध महाविद्यालयांमध्ये इलेक्टोरल लिटरसी क्लबची स्थापना करण्यात आलेली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या विविध कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांना मतदानाची शपथ देण्यात येत आहे. नुकतेच विद्यापीठाने याबाबत परिपत्रक जारी करून विद्यार्थ्यांना लोकशाहीप्रती निष्ठा ठेवण्यासाठी शपथ घेण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर ईव्हीएम व्हीव्हीपॅटची प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी विद्यापीठाने विविध कार्यक्रमाची आखणी केली असून लवकरच पुढील सप्ताहात मॉक मतदानाचे आयोजन करण्यात येणार आहे.
मतदान जनजागृती करिता विद्यापीठाने पुढील सप्ताहात व्यापक उपक्रम आयोजित केले आहेत. यामध्ये मतदार जागृती मोहीम हाती घेऊन रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच मतदार जागृती करिता सुलेखन स्पर्धा, सृजनशील लेखन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व भित्ती चित्र स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन मुंबई विद्यापीठाने केले आहे.
या सप्ताहात अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन विलेपार्ले येथील अमलानी महाविद्यालय, उषा प्रवीण गांधी महाविद्यालय, कमला मेहता महाविद्यालय, नवा समाज महाविद्यालय तर अंधेरी येथील भवन्स महाविद्यालय, सुरजबा बी. एड. महाविद्यालय या महाविद्यालयांमध्ये नुकतेच पार पडले. या कार्यक्रमांमध्ये 1000 हून विद्यार्थ्यांनी उत्स्फुतपणे सहभाग घेतला होता. विभागाचे संचालक प्रा. बळीराम गायकवाड यांनी यासंदर्भात माहिती देण्यात आली.