शिंदेंना घेरण्यासाठी ठाकरेंचं चक्रव्यूह; मुख्यमंत्र्यांविरोधात आनंद दिघेंच्या जवळच्या व्यक्तीला उमेदवारी?

Maharashtra Assembly Elections 2024: शिंदेंच्या शिवसेनेने पहिली यादी जाहीर केली आहे. यादीत पहिलेच नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आहे  

कृष्णात पाटील | Updated: Oct 23, 2024, 09:59 AM IST
शिंदेंना घेरण्यासाठी ठाकरेंचं चक्रव्यूह; मुख्यमंत्र्यांविरोधात आनंद दिघेंच्या जवळच्या व्यक्तीला उमेदवारी? title=
Maharashtra Assembly Elections 2024 Kedar Dighe will contest against the Chief Minister eknath shinde

Maharashtra Assembly Elections 2024: आगामी लोकसभा निवडणुकांसाठी शिवसेनेने पहिली यादी जाहीर केली आहे. शिंदेंच्या शिवसेनेने 45 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यादीत पहिलेच नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आहे. एकनाथ शिंदे हे कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे राहणार आहेत. तर, सूत्रांनुसार, एकनाथ शिंदे यांना टक्कर देण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेने मास्टरप्लान आखला असल्याचे समजते. दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जवळच्या व्यक्तीला उमेदवारी देणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

एकनाथ शिंदे यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे पक्षाकडून केदार दिघे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. केदार दिघे हे दिवंगत नेले आनंद दिघे यांचे पुतणे असून शिवसेना ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख आहेत. कोपरी पाचपाखाडी जिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या विद्यमान आमदार आहेत त्यांच्या विरोधात केदार दिघे हे शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित होत आहे. त्यामुळे शिंदे विरुद्ध दिघे असा सामना कोपरी पाचपाखाडी या विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळू शकतो. 

केदार दिघे यांनी ठाणे शहर आणि कोपरी पाचपाखडी या दोन्ही विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे शहरातून माजी खासदार राजन विचारे यांच्या नावाचा विचार शिवसेना ठाकरे पक्षाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे केदार दिघे हे कोपरी पाचपाखडी या एकनाथ शिंदे विद्यमान आमदार असलेल्या मतदारसंघातून शिंदेंच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचं सूत्रांकडून कळत आहे. केदार दिघे यांना लवकरच या संदर्भात पक्षाकडून आदेश देणार असल्याचे समजतंय. 

सविस्तर वाचाः मनसेचा मेगाप्लान! माजी आमदारपुत्राला मैदानात उतरवले, गोल्डनमॅनचा मुलगा वाढवणार राष्ट्रवादीचे टेन्शन

शिवसेनेच्या उमेदवार यादीची वैशिष्ट्य

शिवसेनेने मंगळवारी रात्री 45 उमेदवारांची .यादी जाहीर केली आहे. या उमेदवाराचे वैशिष्ट्य म्हणजे, सर्व विद्यमान आमदारांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसंच, तीन आमदारपुत्रांना संधी देण्यात आली आहे. तसंच, एकाच घरातील दोन उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. उदय सामंत आणि किरण सामंत या दोन सख्ख्या भावांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, खासदार रविंद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा वायकर यांना जोगेश्वरी पूर्वमधून संधी देण्यात आली आहे.