पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाल्यानंतर रायगडमध्ये तुफान राडा! टायर जाळून रोखला मुंबई-गोवा हायवे

Raigad Guardian Minister Issue: शनिवारी सायंकाळी पालकमंत्रिपदाची यादी जाहीर झाल्यानंतर अचानक समर्थक रस्त्यावर उतरुन त्यांनी रास्तारोको केलं.

Updated: Jan 19, 2025, 09:46 AM IST
पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाल्यानंतर रायगडमध्ये तुफान राडा! टायर जाळून रोखला मुंबई-गोवा हायवे title=
रायगडमध्ये मोठा राडा

Raigad Guardian Minister Issue: रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते भरत गोगावले आग्रही असताना त्यांच्याऐवजी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या तसेच महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना रायगडचं पालकमंत्रिपद सोपवण्यात आलं. यावरुनच शनिवारी रात्रीपासून राडा सुरू झाला आहे. भरत गोगावले यांना डावलून आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्री पद देण्यात आल्याने रायगडमधील शिवसैनिक संतप्त झालेत.

टायर जाळले

मुंबई-गोवा महामार्गावर महाडजवळ रात्री उशिरा शिवसैनिकांनी रस्त्यावर टायर जाळून या निर्णयाचा निषेध केला आहे. शिवसैनिकांकडून गोगावले यांचा जयजयकार करीत खासदार सुनील तटकरे यांचा निषेध करण्यात आला. शिवसैनिकांनी जवळपास 2 तास महामार्ग रोखून धरला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करत शिवसैनिकांना बाजूला केलं आणि वाहतूक सुरळीत केली. सध्या जाळपोळ करण्यात आलेल्या परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त असून तणावपूर्ण शांतता आहे.

नक्की वाचा >> तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? पाहा 34 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची Full List

पाठीत खंजीर खुपसल्याची भावना

गोगावले यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन दावे-प्रतिदावे केला जात होते. पालकमंत्रिपद आपल्यालाच मिळावे यासाठी भरत गोगावले आणि त्यांचे समर्थक आग्रही होते. परंतु पालकमंत्रिपदाची माळ आदिती तटकरे यांच्या गळ्यात पडली. सुनील तटकरे यांनी गोगावले यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याच्या संतप्त भावना शिवसैनिकांनी व्यक्त केल्या आहेत. आज दिवसभर याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

नक्की वाचा >> 'बीडचे राजकारण, प्रश्न...', धनंजय मुंडेंऐवजी अजित पवार बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर सुरेश धसांची प्रतिक्रिया

गोगावलेंची पहिली प्रतिक्रिया

गोगावले यांनीही पालकमंत्रिपदावरुन डावलण्यात आल्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. "हा निर्णय धक्कादायक असून अजिबात अपेक्षित नव्हता," असं गोगावले म्हणालेत. "आम्ही शिवसेना भाजपच्या सहा आमदारांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटून तसं सांगितलं होतं. जिल्ह्यातही तसेच वातावरण तयार झालं होतं. आता जो पालकमंत्रिपदाबाबत निर्णय झाला आहे तो अनपेक्षित आणि मनाला न पटणारा आहे. यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा झालेली नाही. तरीही आमचे नेते एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल," असं गोगावले म्हणाले आहेत.

सिंधुदुर्गच्या पालकमंत्रिपदी नितेश राणे

नितेश राणेंकडे सिंधुदुर्गचं पालकमंत्रिपद सोपवण्यात आलं आहे. या नियुक्तीनंतर नितेश राणेंनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन, "महाराष्ट्र आता थांबणार नाही! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वातील भाजप महायुती सरकारमधील पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. माझ्यावर विश्वास ठेवून मुख्यमंत्री फडणवीसजी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझ्यावर आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवली आहे. माझ्यावर दाखवलेल्या या विश्वासासाठी सर्व वरिष्ठ नेत्यांना खूप खूप धन्यवाद! तसेच मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा ! सर्वांनी एकजुटीने मिळून आपापल्या मिळालेल्या संधीचे सोने करूया," अशी पोस्ट केली आहे.