Maharashtra Rain : ऑगस्ट महिन्यापासून दडी मारून बसलेला पाऊस हवामान खात्याच्या अंदाजानुसार सप्टेंबर महिन्यात बरसण्यास सुरुवात झाली आणि अनेकजण सुखावले. 8 सप्टेंबरपासून सुरु झालेल्या पावसानं पुढील काही दिवसांत राज्यातील बऱ्याच भागांमध्ये जोर धरला. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील काही दिवसांसाठी असंच पर्जन्यमान राहणार असून कोकण, पालघर, ठाणे भागात मुसळधार सरींची हजेरी असणार आहे.
शनिवारपासून जोर धरलेल्या पावसानं रविवारी काही भागांमधून काढता पाय घेतला. पण, असं असलं तरीही हा पाऊस पुढील तीन ते चार दिवसांसाठी कायम असेल असा अंदाज वर्तवला जात आहे. असं न झाल्यास पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे. इथं मुंबईवर काळ्या ढगांचं सावट असलं तरीही पावसाचं प्रमाण मात्र कमीजास्त राहणार आहे. तर, शहराच्या उपनगरीय भागांमध्ये पाऊस उघडीप देताना दिसणार आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रावर पुढील काही दिवस पावसाचं सावट असेल. ज्या धर्तीवर राज्यातील बहुतांश भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यांचा समावेश आहे. दरम्यानच्या काळात मासेमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असं आवाहनही करण्यात आलं आहे.
उत्तर प्रदेशपासून उत्तराखंडपर्यंत या आठवड्यामध्ये पावसाची दमदार हजेरी असेल. 12 सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर तुलनेनं जास्त असेल. उत्तराखंडमध्येही पिथोरगढ, देहरादून, नैनितालमध्ये पाऊस अडचणी निर्माण करु शकतो. तर, पर्वतीय क्षेत्रांमध्ये थंड वारे वाहणार आहेत. दरम्यानच्या काळात उत्तराखंडमध्ये येणाऱ्या पर्यटकांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तिथं हिमाचलमध्ये पाऊस आवरतं घेण्याच्या तयारीत असला तरीही मधूनच त्याची हजेरी पाहायला मिळू शकते. तर, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ येथे 14 सप्टेंबरपर्यंत वातावरण बिघडलेलं असू शकतं. त्यामुळं वादळी वारे वाहण्याचीही शक्यता आहे. त्यामुळं येत्या काळात पाऊस आटोपतं घेईल असं म्हणत जर परराज्यांमध्ये पर्यटनाच्या निमित्तानं जाणार असाल तर एकदा पर्जन्यमानाचा अंदाज पाहून घ्या. कारण, देशभरात एका क्षणात हवामान बदलताना दिसत आहे.