Weather News : देशभरात अनेक भागात गुलाबी थंडीला सुरुवात झाली असून काश्मीर, गोव्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात घट झाली आहे. उत्तराखंडमधील औलीपासून जम्मू-काश्मीर आणि हिमाचलपर्यंत अनेक शहरांमध्ये बर्फाची चादर पसरलीय. काश्मीरमध्ये चिल्लई कलान सुरू असून त्यामुळे कडाक्याची थंडी (Cold wave) वाढली आहे. नद्या, नालेही गोठल्याचे चित्र दिसत आहे. तर राज्यातील अनेक भागात तापमान 10 अंशाच्या खाली गेले आहे. (maharashtra weather news and india meteorological weather today cold wave in marathi)
महाराष्ट्रात सध्या उत्तरेकडे असणाऱ्या जिल्ह्यांसोबतच विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातही थंडीची लाट आली आहे. हवामान विभागाने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील दोन दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. याशिवाय, अनेक भागात धुके पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्याने कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस किमान तापमान दोन ते तीन अंश घट होऊ शकते.
परभणी जिल्ह्यात मागच्या 4 दिवसांपासून थंडीची लाट पसरली असून सर्वत्र हुडहुडी भरली आहे. या जिल्ह्याचे तापमान 10.08 अंशापर्यंत गेले आहे. ग्रामीण भागासह शहरातही ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या चित्र दिसत आहे. गारवा वाढल्याने रब्बी हंगामातील पिकांना फायदा होणार आहे.
डिसेंबर महिन्याचा दुसऱ्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात थंडीचा कडाका आला नव्हता, मात्र या वर्षाला निरोप देताना थंडीचं जोरदार आगमन झालं आहे. वातावरणातील गारव्याचा फायदा रब्बी हंगामातील पिकांना होणार असून पिकांना पोषक वातावरण निर्माण झाल्याने बळीराजा सुखावला आहे. थंडीची लाट आल्यामुळे नाशिकमध्ये चौका चौकात शेकोट्यांचा बाजूला लोक बसलेले दिसत आहे. या वाढत्या थंडीचा फायदा हा कांदा, गहू, हरभरा या पिकांना होणार आहे, असं तज्ज्ञ सांगत आहेत.
गेल्या 24 तासांत अंदमान आणि निकोबार बेट, तामिळनाडू, दक्षिण केरळ आणि लक्षद्वीपमध्ये हलका ते मध्यम पाऊस पाहिला मिळाला. पंजाबमध्ये दाट धुक्याची चादर पसरली आहे. तर हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार आणि त्रिपुराच्या काही भागात मध्यम ते दाट धुके पाहिला मिळत आहे.
दरम्यान दाट धुक्याच्या समस्येने पुन्हा एकदा दिल्लीकरांची चिंता वाढवलीय. त्याचबरोबर वायू प्रदूषणाचा धोका लक्षात घेऊन दिल्लीत GRAP 3 नियम लागू केला आहे. त्यानुसार बांधकाम आणि पाडकामावर बंदी घालण्यात आली आहे.