Maharashtra Weather News : महाराष्ट्र आणि नजीकच्या राज्यांमध्येही मागील काही दिवसांपासून सातत्यानं सुरू असणारा थंडीचा कडाका आता आणखी वाढण्यास सुरुवात झाली आहे. देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या जम्मू काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशसह उत्तराखंड क्षेत्रांमध्ये असणाऱ्या पर्वतरांगांवरून वाहणाऱ्या शीतलहरींचा वेग वाढल्यामुळं थंडीचा कडाका वाढताना दिसत आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळं राज्यावरही त्याचे परिणाम होताना दिसत आहेत. जिथं हवेतील आर्द्रता कमी होऊ वातावरण कोरडं होत असल्याचं निदर्शनास येत आहे. राज्यातील परभणी, निफाड आणि धुळ्यात तापमानानं निच्चांकी आकडा गाठला असून, हा आकडा 10 अंशांच्याही खाली उतरल्याचं पाहायला मिळत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्राच्या कोकणापासून विदर्भापर्यंतच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानाचा आकडा 30 अंशांच्याही खाली आला असल्यामुळे थंडीचा प्रकोप वाढताना दिसत आहे.
बोचऱ्या थंडीला मुंबई शहर आणि उपनगरही अपवाद ठरलेलं नाही. या क्षेत्रांमध्ये दिवसा जाणवणारा उष्मा आणखी वाढत असला तरीही दिवस मावळतीला जाताच हा उष्मा तितक्याच वेगानं कमीसुद्धा होत असून, वातावरणात गारवा जाणवू लागला आहे.
सद्यस्थितीला बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होत असून, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागातून हे क्षेत्र पुढे जाण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवत महाराष्ट्रातील आर्द्रता वाढू शकते अंदाज व्यक्त केला आहे. नोव्हेंबरचा अखेरचा आठवडा आणि डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा किमान तापमानात विक्रमी घट करणारा ठरू शकतो असंही हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात येत आहे.
आयएमडीच्या वृत्तानुसार मंगळवार ते शुक्रवारदरम्यान देशाच्या दक्षिण किनारपट्टी क्षेत्रामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नोव्हेंबरच्या 29 तारखेदरम्यान, आंध्रच्या उत्तर किनारपट्टी भागामध्ये वादळी पावसाचा इशारा देत इथं ताशी 75 किमी वेगानं वारे वाहणार असून, कमी दाबाच्या पट्ट्यामुळं काळ्या ढगांची चादर असेल असाही अंदाज व्यक्त केला आहे. थोडक्यात देशात एकिकडे कडाक्याची थंडी आणि दुसरीकडे मुसळधार पाऊस असंच काहीसं हवामानाचं चित्र येत्या काही दिवसांत पाहायला मिळणार आहे.