Maharashtra Weather News : थंडीतही पावसाचीच सरशी; राज्याच्या कोणत्या भागांवर ढगाळ वातावरणाचं सावट?

Maharashtra Weather News : थंडीचा कडाका वाढणार असला तरीही काही भागांमध्ये पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे. पाहा राज्यातील हवामानाचा अंदाज...

सायली पाटील | Updated: Jan 10, 2025, 07:22 AM IST
Maharashtra Weather News : थंडीतही पावसाचीच सरशी; राज्याच्या कोणत्या भागांवर ढगाळ वातावरणाचं सावट?  title=
Maharashtra Weather news winter wave to get more intense amid rail prdictions latest update

Maharashtra Weather News : देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या बहुतांश राज्यांमध्ये सध्या थंडीचा कडाका वाढताना दिसत आहे. त्याटा थेट परिणाम महाराष्ट्रातही दिसत असून, राज्यात विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये तापमानाच लक्षणीय घट नोंदवली जात आहे. दरम्यानच्या काळात उत्तरेकडील मैदानी भागांप्रमाणंच राज्याच्या बहुतांश भागांमध्ये तापमान 10 अंशांवर पोहोचलं असतानाही पावसाचं सावट चिंतेत भर टाकत आहे. 

हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये कोकण किनारपट्टी क्षेत्रासह उत्तर महाराष्ट्राचाही समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या अरबी समुद्राच्या आग्नेयेकडे चक्राकार वारे वाहत असल्यानं ही स्थिती उदभवल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

हेसुद्धा वाचा : 'रुपयाची चड्डी घसरली!' ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल; म्हणाले, 'मोदींनी 10 वर्षांत...'

 

राज्यातील निच्चांकी तापमानाची नोंद धुळ्यात करण्यात आली असून, इथं पारा 5 अंशांवरपोहोचला आहे, तर सर्वाधिक तापमानाची नोंद रत्नागिरीमध्ये करण्यात आली असून, इथं तापमान 33 अंशांच्या घरात राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

तिथं उत्तर भारतातील पर्वतीय क्षेत्रांमध्ये थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणात वाढत असून, हिमाचल प्रदेशातील शिमला, स्पितीचं खोरं आणि इतर क्षेत्रांमध्ये जोरदार हिमवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, काश्मीरमध्येही पारा उणे 10 अंशांखाली आला असून, कोऱ्यामध्ये  ‘चिल्ला-ए-कलां’ अधिकच तीव्र होताना दिसत आहे. ज्यामुळं नजीकच्या भागांमध्येही किमान तापमानात घट नोंदवण्यात येत आहे. 

आयएमडीच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत थंडीचा जोर कमी होण्याचा अंदाज किंवा तशी शक्यताही नसून, पश्चिमी झंझावात सक्रिय असल्यामुळं देशभरातील हवामानात हा बदल होत असल्याचं सांगण्यात येत आहे. ज्यामुळं पर्वतीय भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांसह प्रशासनालाही सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.