चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, खडवली : काळानुरूप दिवाळी साजरी करण्याच्या पद्धतीत आता आमूलाग्र बदल झाला असला तरी शाळकरी मुलांची किल्ले बनविण्याची हौस काही कमी झालेली नाही. खडवलीमधील नामदेव राऊत गेली तब्बल पाच दशकं दिवाळीतील या किल्ल्यांवर पहा-यासाठी लागणारे मावळे तयार करतात. या दिवाळीत किल्ल्यांचा पहारा करण्यासाठी 50 हजार सैन्यांची फौज तयार आहे..
दिवाळीत अनेक संस्था किल्ले प्रदर्शन आणि स्पर्धा आयोजित करतात. या स्पर्धांच्या निमित्तानं मुलांच्या कल्पकतेला वाव मिळतो. गड-किल्ले म्हटलं की मावळे हवेतच. खडवलीचं राऊत कुटुंबही अक्षरश: शेकडो प्रकारचे मावळे दरवर्षी तयार करतात. यंदाही जवळपास 50 हजार मावळे तयार केलेत. त्याचबरोबर मागणीनुसार तयार किल्लेही राऊत कुटुंबीय बनवून देतात.
नामदेव राऊत यांची तिन्ही मुलं आणि सुना तसंच नातवंडं असं सारं कुटुंबच किल्ल्यांवरील मावळे तयार करण्यात सध्या मग्न आहेत. बाराही महिने त्यांचं मावळे बनवण्याचं काम सुरु असतं. मावळ्यांमधील कमालीची विविधता आणि आकर्षक रंगसंगतीमुळे केवळ ठाणे जिल्ह्यातच नव्हे तर मुंबई आणि रायगडमध्येही त्यांनी बनविलेले मावळे किल्ल्यांची शोभा वाढवता.
दिवाळीतल्या या किल्लेबांधणीत आता अधिक अचूकता आणि कल्पकता दिसून येऊ लागलीय. केवळ मातीचा डोंगर असं किल्ल्याचं स्वरूप राहिलेलं नाही. मुलं त्यासाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि मदत घेतात. त्यामुळे अशा किल्ल्यांवर केवळ ढोबळ मावळे शोभत नाहीत. हे वास्तव लक्षात घेऊन राऊत कुटुंबीय घोडेस्वार, भालदार, चोपदार, शाहीर आणि तोफ डागणारे अशा अनेक प्रकारचे मावळे बनवतात. त्याचबरोबर गडावरील तत्कालिन समाज जीवनाचे दर्शन घडवण्यासाठी विहीर, भाजी विक्रेते आणि चुल असे अनेक प्रकार ते बनवून देतात. त्यामुळे दिवाळीतल्या सुट्टीतील या विरंगुळ्यातून त्यांना आपले पूर्वज आणि परंपरांचेही ज्ञान होतं.