मुंबई : राज्यातील वलयांकीत नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष ट्विटरवर जोरदार ट्रेंड होत आहेत. राज ठाकरे यांनी फेसबुकवर ग्रॅण्ड एन्ट्री केली आणि काही मिनिटांतच #RajThackerayOnFB हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड झाला.
राज ठाकरे आणि चर्चा हे समीकरण महाराष्ट्राला नवीन नाही. त्यामुळे गेले अनेक दिवस ठाकरे यांच्या फेसबुकवरील एंट्रीची चर्चा रंगली होती. खासकरून युवावर्गात ही चर्चा विशेष होती. अखेर ठाकरे यांनी फेसबुकवर एंट्री केली आणि अपेक्षितपणे ती धडाकेबाजही ठरली. कारण पेज सुरू होताच अवघ्या काही तासात ठाकरेंच्या पेजने चाडेचार लाख लाईक्सचा टप्पा पार केला. त्यामुळे राज ठाकरे फेसबुकवर ट्रेंड तर झालेच. पण, हा ट्रेंड ट्विटरवरही मोठ्या प्रमाणात पहायला मिळाला. सध्या ट्विटरच्या भारतातील ट्रेंडमध्ये #RajThackerayOnFB या हॅशटॅगचा जोरदार बोलबाला आहे. #RajThackerayOnFB हा हॅशटॅग भारतातील ट्विटर टेंडवर चौथ्या क्रमांकावर आहे. अल्पावधीतच तो पहिल्या क्रमांकावरही जाऊ शकतो असा अंदाज आहे.
राज ठाकरे हे सध्या राजकीय व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात असले तरी, ते मुळचे हाडाचे व्यंगचित्रकार आहेत. यासोबतच वाचन, चित्रपट, शहर निर्माण, आंतरसांस्कृतिक संवाद या विषयांत त्यांना विशेष रूची आहे. सध्या ते फेसबुक पेजच्या माध्यमातून आपले चाहते आणि कार्यकर्त्यांच्या भेटीला आले आहेत. राजकीय परिस्थितीसह विविध विषयांवर भाष्य करणारे 'ठाकरी' फटकारे पुन्हा एकदा महाराष्ट्राला पहायला मिळणार आहेत. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रातील फटकारे महाराष्ट्राने या आधी पाहिले आहेत. आता राज ठाकरे यांच्या रूपात पुन्हा एकदा 'ठाकरी' 'फटका'रे महाराष्ट्राला पहायला मिळतील.