मुंबई : ज्येष्ठ इतिहासकार, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं सोमवारी सकाळी 5 वाजून 07 मिनिटांनी निधन झाले. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाचं वृत्त कळताच कलाविश्वापासून राजकीय वर्तुळातूनही अनेकांनीच हळहळ व्यक्त केली.
बऱ्याच नेतेमंडळींनी बाबासाहेबांच्या पर्वती येथील निवासस्थानी धाव घेत त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावाचाही समावेश होता.
राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर हार अर्पण करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. निधनाचं वृत्त कळताच ते मुंबईहून पुण्याकडे रवाना झाले होते.
बाबासाहेबांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त ऑगस्ट 2021 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी राज ठाकरे यांनी पुण्यात हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी काही जुन्या आठवणींनाही उजाळा दिला होता.
ठाकरे कुटुंब आणि बाबासाहेब पुरंदरे यांचे असणारे ऋणानुबंध सर्वज्ञात आहेत. या नातेसंबंधांमधला एक तारा बाळासाहेबांच्या निधनानंतर निखळला होता. ज्यानंतर आता बाबासाहेबांच्या निधनानं आणखी एक तारा निखळला. हे दु:ख राज ठाकरे यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे पाहायला मिळत होतं.