सतिश मोहिते, झी मीडिया, नांदेड : आत्महत्या हे कोणत्या समस्येचे उत्तर होऊ शकत नाही. आत्महत्येने कोणतेच प्रश्न सुटत नाहीत. याऊलट अनेक प्रश्न उपस्थित राहतात. आत्महत्या करणारी व्यक्ती जगातून निघून जाते पण त्याच्याशी संबंधित असलेल्या जवळच्या व्यक्तींना धक्क्यातून सावरणं कठीण होऊन जातं. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर राज्यभरात खळबळ उडाली. आता नांदेडमधून अशी धक्कादायक घटना समोर आली आहे.
पोटी तीन मुलं असलेल्या दाम्पत्यानं एकत्र आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी पावलेदेखील उचलली. या घटनेचा त्यांच्या मुलांनी धसका घेतला आहे. नांदेड जिल्ह्यातील वासरणी येथील कैलाश डोंगरे आणि ललिता डांगरे हे जोडपे आपल्या 3 मुलांसोबत राहत होते. दरम्यान शुक्रवारपासून हे दाम्पत्य बेपत्ता होते. मुलांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी शेजारी आणि नातेवाईकांना याबद्दल माहिती दिली. पण दोघेही सापडले नव्हते.
विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न एका विवाहित दांपत्याने केला. यात पत्नीचा मृत्यू झाला तर पती अत्यवस्थ असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शनिवारी सकाळी अर्धापूर तालुक्यातील दाभड शिवारातील एका शेतात दोघे पडलेले आढळले. दाभड येथे बावरी नगर बौध्द विहार आहे. या विहारा समोरील एका शेतात दोघे आढळले. यानंतर परिसरात नागरिकांना मोठा धक्का बसला.
दोघांच्या शेजारी कीटकनाशकाची बॉटल आढळून आली. पत्नी ललिता डोंगरे हीचा जागीच मृत्यू झाला होता. तर पती कैलाश डोंगरे जिवंत असल्याने अत्यवस्थ अवस्थेत त्यांना शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. दोघांना तीन मुली आहेत.
या दोघांनी इतके टोकाचे पाऊलं का उचलले? याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
दुसऱ्या एका घटनेत गोंदियात शेतात काम करणाऱ्या मजुरांवर मधमाशांनी (Bees) हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या भीषण हल्ल्यात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर पाच शेतमजूर जखमी झाले आहेत. अचानक मधमाशांनी केलेल्या हल्ल्यामुळे शेतात एकच गोंधळ उडाला होता. मधमाशांच्या या हल्ल्यामुळे सगळीकडे दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे. गुरुवारी गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातील कुऱ्हाडी गावात ही घटना घडली.
गोंदिया जिल्ह्याच्या कुऱ्हाडी गावात शेतात काम करणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांवर मधमाशांनी अचानक हल्ला केला. या घटनेत एका शेतमजूर महिला व शेतमालक सेवानिवृत्त शिक्षकाचा मृत्यू झाला. पाच शेतमजूर जखमी झाले आहेत. सुमन आनंदराव आमडे व लक्ष्मीचंद पुरनलाल पटले अशी मृतांची नावे आहेत. तर अंकित लक्ष्मीचंद पटले (27), ग्यानीराम उईके (57), माया आमडे (42), अशी प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. जखमींमध्ये मंदा आमडे (42), प्रमिला चौधरी (30) यांचा समावेश आहे. सर्व कुऱ्हाडी गावचे रहिवासी आहेत. मधमाशांच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान याआधीही कुऱ्हाडी गावातील शिक्षक श्रावण कुंभारे यांचाही अशाच मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.