विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : पावसाळा मध्यावर आला आहे तरीही मराठवाडा अजून सुद्धा कोरडाच आहे. मराठवाड्यात सरासरीच्या अवघा चाळीस टक्केच पाऊस आतापर्यंत झाला आहे. तर मराठवाड्यातील सगळ्या प्रकल्पांत मिळून अवघा दहा टक्के इतकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे येणारा काळ अधिक भीषण दुष्काळ घेऊन येईल अशी चिंता साऱ्या मराठवाड्याला लागली आहे.
मराठवाड्याची टँकरवाडा अशी ओळख तयार झाली असताना येणाऱ्या काळात त्याच टँकरमध्ये पाणी तरी कुठून आणणार याची चिंता सध्या प्रशासनाला लागली आहे. एकमेव जायकवाडी धरण सोडलं तर सगळीकडे कोरडंठाक आहे. अशामध्ये किमान पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावं म्हणून विभागीय आयुक्तांनी मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात ६०० सार्वजनिक विहिरी खोदण्याच्या सूचना दिल्यात. बीड, नांदेडसारख्या मोठ्या जिल्ह्यांत या विहिरींच्या संख्येत वाढ करण्यात येणार आहे.
या सार्वजनिक विहिरी खोदण्यासाठी जवळपास साडेतीनशे कोटी रुपये लागणार आहेत. त्यात एक विहिरीला 7 लाख रुपयांपर्यंत अंदाजपत्रक तयार करता येतील अशी मान्यता राज्य सरकारने दिली आहे. रोजगार हमीतून या विहिरी खोदण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. बहुतांश विहिरी या धरणांच्या बुडीत क्षेत्रात किंवा अस्तित्वात असणाऱ्या पाणीपुरवठा योजनेच्या जवळपास घेतल्या जाव्यात अशाही सूचना करण्यात आल्या आहेत.
सध्या मराठवाड्यातली भूजल पातळी १४ मीटरपर्यंत खाली गेली आहे. त्यामुळे नव्यानं खोदलेल्या विहिरींत पाणी येईल का हा प्रश्नच आहे.
मराठवाड्याची अवस्था सध्या दयनीय आहे. आकाशातून काळे ढगच जणू पसार झाले आहेत. सगळीकडे कडक उन पडलंय आणि पिकं वाळून जाऊ लागली आहेत. जलसंधारणाची अनेक कामं करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची पेरणी करुनही मराठवाडा मात्र कोरडाच आहे. आता या नव्या सार्वजनिक विहिरी पाणीदार होतील का याकडं तहानलेल्या मराठवाड्याचं लक्ष असेल.
<iframe width="560" height="350" src="https://zeenews.india.com/marathi/live/embed" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; encrypted-media; gyroscope; picture-in-picture" allowfullscreen></iframe>