नाशिक: 'वॉक विथ कमिशनर' उपक्रमामुळे बंद व्यायामशाळा अन् वाचनालयं खुली

आयुक्त मुंढे यांनी अवघ्या दोन तासात  केलेल्या धडाकेबाज कारवाईचे सामान्य नागरिकांनी टाळ्या वाजवत स्वागत केले.

Updated: May 27, 2018, 09:14 AM IST
नाशिक: 'वॉक विथ कमिशनर' उपक्रमामुळे बंद व्यायामशाळा अन् वाचनालयं खुली title=

नाशिक: मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या वॉक विथ कमिशनर उपक्रमामुळे मागील चार वर्षांपासून बंद असलेल्या व्यायामशाळा अन्  वाचनालयं खुली करण्यात आली आहेत. या उपक्रमाचा परिणाम असा झाला की, व्यायाम शाळेच्या आवारात असलेले म्हशीचा गोठा आणि पत्र्याचे शेड दोन तासात जमिनदोस्त करण्यात आले. त्यामुळे कानाडोळा करणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणलेत. अवघ्या दोन तासात आयुक्त मुंढे यांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईचे सामान्य नागरिकांनी टाळ्या वाजवत स्वागत केले.

'सिडकोतील अनधिकृत बांधकाम तोडणारच'

दरम्यान, 'सिडकोतील अनधिकृत बांधकाम तोडणारच' असं विधान नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलं आहे. अतिक्रमण स्थगितीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुठलाही आदेश दिला नसल्याचंही मुंढे यांनी स्पष्ट केलं असून,३१ मे पू्र्वी अतिक्रम हटवा अन्यथा ३१ मे रोजीनंतर महापालिका अतिक्रमण हटवेलं असं मुंढे यांनी सांगितलं. रस्त्यावरील आणि चौकातील अतिक्रमण असल्यास नोटिसा देण्याची गरज नसते याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असल्यामुळे ज्या ठिकाणी पार्किंग केले आहे ते अतिक्रमण तोडले जाईलं असंही त्यांनी सांगितलं.

आयुक्त विरुद्ध राजकारणी

विशेष म्हणजे, एरवी बेदरकार असलेले हे लॉन्स मालक आता चांगलेच धास्तावलेत. मुळात मनपा थेट तोडकामाचेच आदेश काढेल याची कल्पनाच या लॉन मालकांना नव्हती. १ जूनपासून शहरात अनधिकृत बांधकामं करणाऱ्यांचं काही खरं नाही. आयुक्तांनी अनधिकृत बांधकामांना भुईसपाट करण्याचा चंगच बांधलाय. गंमत म्हणजे लॉन मालकांमध्ये अनेक राजकीय नेत्यांचा आणि त्यांच्या नातेवाईकांचा भरणा आहे. त्यामुळे ही कारवाई खरोखर झालीच तर नाशिकमध्ये आयुक्त विरूद्ध राजकारणी असा नवाच संघर्ष उफाळण्याची चिन्हं आहेत. नाशिककरांना मात्र अनधिकृत बांधकामांपासून मुक्ती हवी आहे.