कार्ला, लोणावळा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोणावळ्याजवळच्या कार्ला इथल्या एकविरा देवीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आणि आमदार आदित्य ठाकरेही उपस्थित होते. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रथमच एकविरा देवीच्या दर्शनाला पोहोचले.
एकविरा देवी ठाकरे कुटुंबाची कुलदैवत आहे. अनेकदा ठाकरे कुटुंब एकविरा देवीच्या दर्शनाला येत असतं. एकविरा देवीचं दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरे शिवनेरी गडावर दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच दौरा आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असणाऱ्या किल्ले शिवनेरीवरून उद्धव ठाकरे सरसकट शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यावर मी स्वत: शिवनेरीवर जाणार, शिवाय कुलदैवत एकवीरेचंही दर्शन घेणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं होतं.