कैलास पुरी, झी मिडिया, पिंपरी चिंचवड : आधुनिकतेच्या कितीही गप्पा आपण मारत असलो तरी ही समाजात अंधश्रद्धा अजून ही खोलपर्यंत रुजली असल्याचंच अनेकदा समोर येतंय. अशीच एक घटना पिंपरी चिंचवड आणि जुन्नर मध्ये घडलीय. गुप्तधन हवे असेल तर लहान मुलीचा बळी द्यावा लागेल असे एका भोंदू बाबाने जुन्नर मध्ये राहणाऱ्या कुटुंबाला सांगितलं.
त्यानुसार त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये राहाणाऱ्या 4 वर्षीय मुलीचं अपहरण केलं. पण पोलिसांच्या तत्परतेने त्यांचा हा कट उधळला गेला आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. या प्रकरणी विमल संतोष चौगुले, संतोष मनोहर चौगुले, सुनीता अशोक नलावडे, निकिता अशोक नलावडे यांना अटक करण्यात आली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
मुलीचे अपहरण करण्यासाठी चौघुले कुटुंबाने चित्रपटाला ही लाजवेल असा कट रचला. बहिणीच्या घरी राहण्याच्या बहाण्याने हे कुटुंब विमल नलावडे यांच्या घरी रहायला आले. त्या नंतर कुटुंबातील लहान मुलांच्या साहाय्याने शेजारीच राहणाऱ्या 4 वर्षीय मुलीला चॉकलेट देणे, आईस्क्रीम देणे असे प्रकार सुरू केले.
त्यामुळे ती चिमुकली नलावडे यांच्या घरी जाऊ येऊ लागले. त्याचाच फायदा उचलत अल्पवयीन मुलाच्या मदतीने तीचे अपहरण करण्यात आले. या प्रकरणी चिखली पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तपासाची सूत्र वेगाने फिरवली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासलं.
सीसीटीव्ही मध्ये मुलीला घेऊन जात असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी आणखी तपास केला. आरोपी मुलीला जुन्नर मध्ये घेऊन गेले असल्याचे पोलिसांच्या लक्षात येताच त्याची माहिती जुन्नर पोलिसांना देण्यात आली. जुन्नर पोलिसांनी ही त्यावर तात्काळ कारवाई करत पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मदतीने आरोपींना बेड्या ठोकल्या. पोलिसांच्या तत्परतेमुळे एका चिमुरडीचे प्राण वाचल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.