Pregnant woman dies of sunstroke: महाराष्ट्रातील पालघर (Palghar) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. दुर्गम भागातील गावामधून प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत पायी चालत आलेल्या गरोदर महिलेचा (Pregnant woman) दुर्देवी मृत्यू झाला आहे. 21 वर्षीय गर्भवती महिला आरोग्य केंद्रावर जाण्यासाठी तब्बल 7 किलोमीटर चालली. मात्र आरोग्य केंद्रावरुन घरी गेल्यानंतर या महिलेला उन्हाचा फार त्रास झाला आणि यातच तिचा मृत्यू झाला. उष्माघाताचा त्रास झाल्याने या महिलेचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. या महिलेच्या मृत्यूसंदर्भातील बातमी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना पालघरमधील सिव्हिल सर्जन असलेल्या डॉ. संजय बोबाडेंनी दिली आहे.
डहाणूमधील ओसर वीरा गावातील सोनाली वाघाट नावाची महिला रणरणत्या उन्हात गावापासून साडेतीन किलोमीटर दूर असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर पोहोचली. त्यानंतर या महिलेने ऑटो रिक्षाने तावा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गाठलं. या ठिकाणी नऊ महिन्याची गरोदर असलेल्या सोनालीची तपासणी करुन तिला घरी पाठवण्यात आलं. महामार्गावर उतरल्यानंतर ही महिला पुन्हा साडेतीन किलोमीटर चालत आपल्या घरी गेली. उन्हामध्ये एवढं चालल्याने सोनालीला सायंकाळी फार त्रास झाला. सोनालीची तब्बेत खालावल्याने तिला जवळच्या धुंदळवाडी प्राथमिक केंद्रात दाखल करण्यात आलं. त्यानंतर तिला कासा येथील मोठ्या आरोग्य केंद्रात पाठवण्यात आलं.
कासा येथील आरोग्य केंद्रावर सोनलची तपासणी करण्यात आली. तिच्या वेगवेगळ्या चाचण्या करण्यात आल्यानंतर तिला अनेक व्याधी असल्याचं स्पष्ट झालं. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार सोनलची तपासणी केली जात असतानाही तिला ताप होता. पुढील उपचारांसाठी सोननला धुंदळवाडीतील स्पेशलिस्ट डॉक्टरकडे पाठवण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, धुंदळवाडीला जाताना रुग्णवाहिकेमध्येच सोनलने प्राण सोडला. सोनलच्या गर्भात असलेलं बाळही दगावलं.
रणरणत्या उन्हात 7 किमी अंतर चालल्याने सोनलला फार थकवा आला. याच उष्णतेचा तिला त्रास झाला. उष्माघाताचा त्रास झाल्याने सायंकाळी तिची तब्बेत बिघडली आणि त्याच कारणाने तिचा मृत्यू झाला, असं आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं. अशाप्रकारे दुर्गमभागातील महिलेचा मृत्यू झाल्याची ही काही पहिलीच वेळ नाही. अपुऱ्या वाहतूक व्यवस्थेमुळे अनेकदा आदिवासी पाड्यांमधील आणि दुर्गम भागातील गावांमधील महिलांचे प्राण गेले आहेत. अनेक आरोग्य केंद्र ही जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा गावांपासून दूर असल्याने तिथे पोहोचायलाच जास्त वेळ लागतो. तसेच दुर्गम भागातून मुख्य रस्त्यांपर्यंत येण्यासाठी अनेक ठिकाणी चालत जाण्याशिवाय इतर पर्याय नसतो. त्यामुळेच अनेक ठिकाणी फिरता दवाखाना ही सुविधा सुरु करण्यात आली असली तरी अडचणीच्या वेळी या भागातील लोकांची गैरसोयच होते.