मुंबई : भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी काम करणारे, जांभूळ पाडा, रायगड येथील अती दुर्गम भागात आदीवासी हक्कांसाठी झटणारे डॉ. चंद्रकांत पुरी (वय 50) यांचे निधन झाले आहे. ते मुंबई विद्यापीठाच्या राजीव गांधी समकालीन अध्ययन केंद्राचे माजी संचालक होते. तसेच महिला विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण विभागाचे संचालकपदी होते. चंद्रकांत पुरी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यावर चेंबुर येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि पत्नी असा परिवार आहे. त्यांचे 'कार्यकर्त्याची डायरी' हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
डाँ. चंद्रकांत पुरी यांनी भटक्या विभक्त समाजासाठी विशेष कार्य केले आहे. टाटा समाज विज्ञान संस्थेत प्रोफेसर म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर एसएनडीटी विद्यापीठात ते संचालक म्हणून ते काम करू लागले. मुंबई विद्यापीठात राजीव गांधी सेंटर फॉर कंटेम्पनरी स्टडीज येथे चेअर प्रोफेसर म्हणून काम करीत असताना पीएचडी गाईड म्हणून काम पाहू लागले. याच सेंटरमधे समाजसेवेचा अभ्यासक्रम त्यांच्या अख्त्यारीत सुरु झाला. पुरी यांनी महिला कैदी आणि तृतियपंथीयासाठी देखील शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू केला. शेकडो गरीब मुलांचे शैक्षणिक पालकत्व त्यांनी स्वीकारले होते. तसेच त्यांचे विविध सामाजिक प्रश्नांवरील शंभराहून अधिक लघु तथा शोधनिबंध लेखन प्रसिद्ध आहेत.