हेमंत चापुडे, झी मीडिया, पुणे : व्यवसायातील प्रतिस्पर्धी आणि बदनामी केल्याचा राग मनात धरुन बाजार समितीच्या उमेदवाराची निघृण हत्या (Pune Crime) केल्याचा धक्कादायक प्रकार जुन्नर (Junnar) तालुक्यातील बेल्हे येथे घडला आहे. किशोर तांबे असं मृत व्यक्तीचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. जुन्नर बाजार समितीचे उमेदवार किशोर तांबे यांची शनिवारी निर्घृण हत्या झाल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Pune Police) स्थानिक गुन्हे शाखेने आणि आळेफाटा पोलिसांनी 24 तासाच्या आत आरोपींच्या मुस्क्या आवळत दोन आरोपींना अटक केली आहे.
तांबेवाडी बेल्हे येथील किशोर तांबे (40) हे शेतात जातो असे सांगून घरातून निघाले होते. मात्र किशोर तांबे त्यानंतर घरी परतलेच नाही. 5 एप्रिलपासून ते बेपत्ता होते. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. तांबे कुटुंबियांची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांनी शेतात जाऊन तपास केला असता त्यांनी तिथे रक्ताचे डाग आढळून आले आणि झटापट झाल्याचे दिसून आले. त्यानंतर श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. श्वान पथकाने कॅनलपर्यंत माग काढला पण त्यापुढे काही मिळाले नाही.
त्यानंतर आळेफाटा पोलिसांनी काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. यामध्ये पांडुरंग जिजाबा तांबे व महेश गोरकनाथ कसाळ यांच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यावेळी आपण दोघांनी किशोर तांबे यांचा खून करुन मृतदेह विहिरीत टाकल्याचे कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी शनिवारी तांबे यांचा मृतदेह विहिरीबाहेर काढला.
कशी झाली हत्या?
मुरूम व्यवसायातील स्पर्धेमुळे तसेच बदनामी केल्याचा राग मनात धरून आरोपींनी ही हत्या केल्याचे समोर आले आहे.
किशोर तांबे शेतात गेल्यानंतर आरोपींसोब त्यांची झटापट झाली. आरोपींनी किशोर तांबे यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. यातच किशोर तांबे यांचा मृत्यू झाला. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी तांबे यांचा मृतदेह एका पोत्यात भरून विहिरीमध्ये टाकून दिला. मृतदेह वर येऊ नये म्हणून मृतदेहासोबत पोत्यात दगड भरले आणि तो विहिरीत फेकून दिला.
पोलिसांनी काय सांगितले?
"व्यावसायिक वादातून प्रतिस्पर्धींमध्ये वाद होता. निवडणुकीचा अर्ज पात्र झाल्यानंतर काही कालावधीने ही घटना घडली. आरोपींवर भादवि कलम 302, 201, 120 ब 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे," अशी माहिती आळेफाटा पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी दिली.