पुणेः पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल वैशालीचा वाद पुन्हा पेटला आहे. हॉटेलच्या मालक असलेल्या निकिता शेट्टी यांनी आता आपल्या पती विरोधात आरोप केले आहेत. चार वर्षाच्या मुलीला घेऊन पती मागील दोन महिन्यापासून बेपत्ता आहे, असा आरोप त्यांनी केला आहे, तसंच, मुलीला शोधून द्यावे आणि पतीला अटक करण्यात यावी, अशी मागणी निकीता शेट्टी यांनी केली आहे.
पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील प्रसिद्ध हॉटेल वैशालीचा वाद अजूनही संपताना दिसत नाही. हॉटेल वैशालीची पावर ऑफ अॅटर्नि बंदुकीचा धाक दाखवून आपल्या पतीनेच नावावर करून घेतल्याचा आरोप हॉटेलच्या मालकीण असलेल्या निकिता शेट्टी यांनी केला होता. त्यानंतर पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी कौटुंबिक छळाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणात निकीता शेट्टी यांनी आणखी एक नवा आरोप केला आहे.
दोन महिन्यांपासून मी माझ्या मुलीचा चेहरादेखील पाहिलेला नाहीये. तिची आणि माझी भेट घडवावी, अशी विनंती मालक निकीता शेट्टी यांनी पुणे पोलिसांकडे केली आहे. त्याचबरोबर या प्रकरणात गुन्हा दाखल असूनही पोलिस कारवाई करण्यास टाळाटाळ का करत आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
18 जूनला मी पोलिसांत गुन्हा नोंदवला होता. आता तो फरार झाला आहे. माझ्या मुलीलाही घेऊन गेला आहे. दोन महिन्यांपासून मी मुलीला बघितले नाहीये. त्याच्यावर पाच कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्याने माझ्याकडून जबरदस्ती सर्व संपत्ती हडप केली आहे, अशी प्रतिक्रिया निकीता शेट्टी यांनी दिली आहे.
पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई करत त्याला अटक करावी व माझ्या मुलीला शोधून काढावे, असं निकीता शेट्टी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. माझ्या पतीने संपत्तीचे गिफ्ट डीड केले आहे. घर, फार्म हाऊस, पैसे माझ्याकडे काहीच राहिलं नाहीये, असंही त्यांनी पुढे नमूद केलं आहे.
विश्वजीत विनायकराव जाधव, अभिजीत विनायकराव जाधव, विनायकराव जाधव आणि वैशाली गायकवाड जाधव यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आता नवीन ट्विस्ट निर्माण झाला आहे. आता पोलीस काय भूमिका घेतात त्याकडे लक्ष लागलं आहे.