'हे असले छक्के पंजे माझ्याशी नाही करायचे,' राहुल नार्वेकर लोकांवर संतापले, आता स्पष्टीकरण देत म्हणाले 'त्यांची..'

राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा त्यांच्या कुलाबा विधानसभा मतदारसंघातील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत ते मतदारसंघातील लोकांवर चांगलेच संतापलेले दिसत होते.   

शिवराज यादव | Updated: Oct 4, 2023, 11:55 AM IST
'हे असले छक्के पंजे माझ्याशी नाही करायचे,' राहुल नार्वेकर लोकांवर संतापले, आता स्पष्टीकरण देत म्हणाले 'त्यांची..' title=

राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. या व्हिडीओत राहुल नार्वेकर आपल्या मतदारसंघातील नागरिकांवर संतापलेले दिसत होते. संजय नार्वेकर कुलाबा, कोळीवाडा या मतदारसंघात विकासकामांची पाहणी करण्यासाठी गेले असता तेथील नागरिकांनी काही तक्रारी केल्या होत्या. यानंतर राहुल नार्वेकर भडकले आणि इकडे कोणाची मक्तेदारी चालणार नाही. एक-दोन लोकांना घेऊन चालणारा माणूस मी नाही अशा शब्दात सुनावलं होतं. दरम्यान राहुल नार्वेकर यांनी यावर आता स्पष्टीकरण दिलं आहे. 

राहुल नार्वेकर यांचं स्पष्टीकरण

"अनेक माध्यमातून, लोकांकडून माझ्या निर्णय प्रक्रियेवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण यापूर्वी सांगितल्याप्रमाणे मी अपात्रतेचा निर्णय नियमानुसार तसंच संविधानातील तरतुदींच्या आधारेच घेणार आहे. कोणी कितीही मला प्रभावित करण्याचा प्रयत्न केला, आरोप केले तरी मी त्यातून कोणत्याही प्रकारे प्रभावित होणार नाही. नियमानुसारच मी काम करणार आहे," असं राहुल नार्वेकर म्हणाले आहेत. 

"माझा परदेश दौरा मी 26 तारखेलाच रद्द केला होता. यासंबंधी मी सीपीएला कळवलं होतं. माझे पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने परिषदेसाठी उपस्थित राहू शकणार नाही असं कळवलं होतं. पण 28 तारखेला या दौऱ्याविषयी उगाच चर्चा घडवून आपण हा दौरा रद्द करायला लावला असं दाखवण्याचा केविलवाणा प्रकार काही नेत्यांनी आणि लोकांनी केला. अध्यक्षांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण अध्यक्ष अशा धमक्यांना घाबरत नाही. मी अशा गोष्टींनी प्रभावित होणार नाही," असं राहुल नार्वेकर यांनी सांगितलं आहे. 

"माझ्या मतदारसंघात मी इतरांप्रमाणे विधानपरिषदेच्या आमदारांकडून काम चालवत नाही. मी माझ्या मतदारसंघात स्वत: उतरुन काम करतो. आजही दिवसातील 4 तास माझ्या कार्यालयात बसून आपल्या विभागातील प्रश्न सोडवतो. त्यामुळे ज्या लोकांना विधानसभा मतदारसंघ इतर लोकप्रतिनिधींच्या मार्फत चालवण्याची सवय आहे त्यांना प्रश्न कसे सोडवायचे हे माहितीच नाही," असं उत्तर त्यांनी टीका करणाऱ्यांना दिलं आहे. 

 
"आपण आपल्या मतदारसंघात जातो, विकासकामांचा आढावा घेतो, त्याला विरोध करणाऱ्यांची कानउघडणी करतो असाच तो एक प्रकार होता. त्याचा जर कोणी वेगळा अर्थ काढत असेल तर त्यांना त्याबद्दल शुभेच्छा. अशाप्रकारे अध्यक्षांवर कोणताही दबाव पडणार नाही असं आश्वासन देतो.  नियम पाळणं आणि नियानुसार काम करणं लोकशाहीची हत्या आहे का? कोणाचीही बाजू न ऐकता निर्णय दिला तर हेच आरोप करतील. ज्यांच्या आरोपात तथ्य नाही त्यांना काय उत्तर देणार.  ज्यांना संविधान, नियमाचं ज्ञान नाही त्यांच्या टिप्पणीवर बोलून वेळ उचित घालवणं योग्य नाही," असं स्पष्टीकरण राहुल नार्वेकर यांनी दिलं आहे. 

 

"मी निर्णय घेण्यात कोणतीही दिरंगाई किंवा घाई करणार नाही, जेणेकरुन अन्याय होऊ नये. कोणी कोणताही आरोप केला तरी तत्वं, संविधानाला हानीकारक असेल असं कृत्य करणार नाही," असं राहुल नार्वेकर म्हणाले आहेत. 

नेमकं काय झालं होतं?

राहुल नार्वेकर कुलाबा मतदारसंघात फिरत असताना काहींनी त्यांच्याकडे विकासकामं करतान विश्वासात घेतलं जात नसल्याची तक्रार केली. यावरुन राहुल नार्वेकर चांगलेच भडकले होते. त्यांना वाटत असेल की आपल्याला विचारून करावं लागेल तर त्यांचे कर्म काय आहे ते मला काढावं लागेल. मी हिशोब काढायला बसलो तर खैर नाही. माझ्यासोबत दुटप्पीपणा करू नका, लोकांमध्ये उभा राहणारा माणूस आहे. मी घरात बसून निवडणुका लढत नाही अशा शब्दांत राहुल नार्वेकर यांनी सुनावलं होतं. 

"निवडणुका लढून 5 वर्षांनी तोंड दाखवणारा नाही. निवडणुकीला ज्याच्या पाठी उभा राहिलात तो पाच वर्षे जाऊन बांद्रा येथे बसला त्यांना विचारा. माझ्यासोबत काम करायचं तर सरळ काम करायचं. छक्के पंजे माझ्याजवळ चालत नाहीत. माझ्याकडे खूप काही करण्यासारखं आहे. मी शांत बसतो त्याचा अर्थ वेगळा घेऊ नका," असं म्हणत राहुल नार्वेकर निघून गेले होते.