Video: 'मोदींनी 70 हजारांचा घोटाळा काढला अन्...'; अजित पवारांची मिमिक्री करत राज ठाकरेंचा टोला

Raj Thackeray Mimicry Of Ajit Pawar: पनवेलमध्ये राज ठाकरेंनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. याचवेळी भाषणामध्ये राज ठाकरेंनी भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाचा समाचार घेताना अजित पवार आणि छगन भुजबळ यांचा संदर्भ दिला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 16, 2023, 03:28 PM IST
Video: 'मोदींनी 70 हजारांचा घोटाळा काढला अन्...'; अजित पवारांची मिमिक्री करत राज ठाकरेंचा टोला title=
राज ठाकरेंनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची मिमिक्री केली

Raj Thackeray Mimicry Of Ajit Pawar: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला. महाराष्ट्र भाजपाने सिन्नरमधील टोलनाक्याची तोडफोड झाल्यानंतर अमित ठाकरेंवर केलेल्या टीकेचा उल्लेख करत राज ठाकरेंनी भाजपाला फोडाफोडीच्या राजकारणावरुन लक्ष्य केलं. फोडाफोडीच्या राजकारणाबद्दल बोलताना राज ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांचा संदर्भ आपल्या भाषणामध्ये दिला. 

भाजपाला केलं लक्ष्य

मुंबई-गोवा महामार्गाच्या बांधकामासंदर्भात मनसेनं आंदोलन सुरु केलं असून यासाठी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने राज यांनी आज पनवेलमध्ये कार्यकर्त्यांसमोर भाषण केलं. रस्त्यांच्या अवस्थेबद्दल बोलताना राज यांनी टोलनाक्यांचा उल्लेख केला. भाजपाने केलेल्या "अमित ठाकरे टोल नाका फोडणे म्हणजे राजकारण नाही. कधीतरी बांधायलाही शिका आणि शिकवा," या टीकेवरुन राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीत टोला लगावला. "अमित कुठेतरी जात होतो तेव्हा टोलनाका फुटला. लगेच भाजपाने त्यावर टीप्पणी सुरु केली. रस्ते बांधायला पण शिका आणि टोल उभे करायला पण शिका. मला असं वाटतं भाजपाने दुसऱ्यांचे आमदार न फोडता पक्ष उभा करायला पण शिकावं," असं म्हणत राज यांनी भाजपाला सुनावलं. यानंतर राज ठाकरेंनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीच्या मुद्द्याला हात घातला.

अजित पवारांची मिमिक्री

पुढे बोलताना राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या आमदाराने केलेल्या बंडखोरीचा संदर्भ देत अजित पवार गटावर निशाणा साधला. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यातील उद्योजक चोरडिया यांच्या घरी भेट घेतली होती. या भेटीच्या वेळी अजित पवार आपल्या कारमधून लपून बंगल्याबाहेर पडल्याच्या बातम्या समोर आल्या. याचाचा संदर्भ राज यांनी भाजपाच्या पक्ष फोडीच्या राजकारणाबद्दल बोलताना दिला. "लोकांच्या कनपट्टीवर बंदुका ठेवायच्या आणि आतमध्ये (पक्षामध्ये किंवा आपल्या बाजूने) आणायचे. मग ही लोक आतमध्ये गाडीत झोपून जाणार," असं राज यांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. पुढे राज ठाकरेंनी अजित पवारांची मिमिक्रीही केली. "मी तुम्हाला दिसलो का गाडीमध्ये झोपलो होतो का?" असं राज यांनी अजित पवारांची नक्कल करत म्हटलं. पुढे राज यांनी, "निर्ल्लजपणाचा कळस सुरु आहे महाराष्ट्रामध्ये," असं म्हणत संपात व्यक्त केला. 

 छगन भुजबळांचीही केली नक्कल

राज ठाकरेंनी छगन भुजबळांचीही नक्कल केली. आपण या सरकारमध्ये का आलेले आहात? असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर भुजबळ कसं उत्तर देतात हे राज यांनी मिमिक्री करत दाखवलं. "महाराष्ट्राचा विकास करायचा आहे," असं भुजबळांची नक्कल करत राज म्हणाले. "मला अरे कशाला खोटं बोलताय. 6 दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी तुमचा 70 हजारांचा घोटाळा काढला. टुणकन् इथे आले सगळे. भुजबळांनी सांगितलेलं असणार आत काय काय असतं. जाऊ नका. इथे करु आपण," असं राज यांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला.