Maharashtra Guardian Ministers : बहुप्रतीक्षित पालकमंत्रिपदांची यादी जाहीर झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे गडचिरोलीची जबाबदारी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे आणि मुंबई शहरचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे बीड आणि पुण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल, धनंजय मुंडे यांनी अजित पवारांच अभिनंदन केलं आहे.
बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय ना. अजितदादा पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व खूप खूप स्वागत. आदरणीय दादांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्याच्या विकासाला पुणे जिल्ह्याप्रमाणे अधिकची गती आणि चालना मिळेल असा मला विश्वास आहे.
बीड जिल्ह्यातील सध्या बदललेली राजकीय व सामाजिक स्थिती पाहता आदरणीय मुख्यमंत्री महोदय व आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय यांना मी स्वतः बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद आदरणीय अजितदादांनी स्वीकारण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार दादांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारले, याचा मला आनंद वाटतो.
सद्यस्थितीत मला कोणत्याच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी नको, अशी माझी विनंतीही मान्य केल्याबद्दल मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री महोदयांचे आभार! मला दिलेल्या विभागाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील अशी पोस्ट धनंजय मुंडे यांनी केली आहे.
बीडमधील जे प्रश्न आहेत, ते इतके जटील झाले आहेत ते पाहता अजित पवार यांनी तिथे स्वतः जाणे पसंत केले असेल. पालकमंत्री पदाची जबाबदारी वाटण्याचे काम हे सत्तेत बसलेल्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांचा असते. कोणाला कुठला पालकमंत्री पद दिल यावर टीका टिपणी करण्यापेक्षा ज्याला जी जबाबदारी दिलेत ते कशा पद्धतीने पार पाडतात हे पाहुयात अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.