बंगळुरुमध्ये एक 40 वर्षीय महिला सासूला ठार करण्यासाठी औषधं सुचवा अशी विनंती घेऊन थेट डॉक्टरकडे पोहोचली होती. यानंतर तिला थेट पोलिसांनीच समन्स पाठवलं. यावेळी तिने पलटी मारत आपण तर आत्महत्या करण्यासाठी सल्ला मागत होतो असा दावा केला. आठवड्याच्या सुरुवातीला ही घटना घडली आहे. महिलेने बंगळुरुमधील संजय नगरमध्ये वास्तव्यास असणाऱ्या डॉक्टर सुनील कुमार यांना मध्यरात्री 2 वाजून 10 मिनिटांनी मेसेज केला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने डॉक्टरला आपल्या 70 वर्षीय सासूची हत्या करण्यासाठी धीम्या पद्धतीने विष कसं देता येईल याबाबत विचारलं होतं. डॉक्टरने नकार दिल्यानंतर महिलेने सर्व मेसेज डिलीट करुन टाकले होते. पण तोपर्यंत डॉक्टर कुमार यांनी मेसेजचे स्क्रीनशॉट काढले होते आणि पोलिसांना कळवलं होतं.
प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉक्टर कुमार यांनी आपल्यासाठी हा फार धक्कादायक अनुभव होता असं सांगितलं. तसंच लोक आपल्याकडे अशा प्रकारची विनंती करतात हे पाहून फार वेदना झाल्याचंही सांगितलं. "मी तिला सांगितलं की, डॉक्टरांचं काम लोकांचा जीव वाचवणं आहे, घेणं नाही". डॉक्टर कुमार यांनी कळवल्यानंतर पोलिसांनी महिलेला शोधून काढत समन्स पाठवलं.
पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, "महिला आपल्या पतीसह आली होती. आपल्याला ऑनलाइन डॉक्टरांचा नंबर मिळाला. आपल्याला सासूला मारायचं नव्हतं, तर आत्महत्या करायची होती असा तिचा दावा आहे. आपण सासूच्या नावे विचारलं जेणेकरुन आपल्याला माहिती मिळू शकेल असं तिचं म्हणणं आहे".
महिलेचा पती चालक असून, त्यांना एक मुलगी आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास केला असून, महिलेकडून लिखित स्टेटमेंट घेतलं आहे.