मांजरी पाळणार असाल तर सावधान; पालिकेने दिले नसबंदीचे आदेश

Cats Sterilization: नाशिक महापालिकेची लोकसंख्या साधारणत 30 लाखदरम्यान आहे. मात्र इथे मांजरांचीही संख्याही लक्षणीय वाढलीये 

Pravin Dabholkar | Updated: Feb 20, 2025, 09:19 PM IST
मांजरी पाळणार असाल तर सावधान; पालिकेने दिले नसबंदीचे आदेश
मांजरीची नसबंदी

Cats Sterilization: राजकारणात आणि रोजच्या जीवनात कुत्र्या मांजरांचा खेळ आपण रोजच ऐकतो आणि बघतोही. कुत्र्यांपासून जसा रेबीज होतो तसा मांजरांपासून सुद्धा होऊ शकतो त्यामुळे कुत्र्यांच्या नसबंदी बरोबर आता मांजरांचीही नसबंदी नाशिक महापालिका करणार आहे.

सध्या धावपळीच्या जीवनाता प्रत्येक माणूस एक भावनिक आधार शोधत असतो. यासाठी कुत्र्यांसोबत आता मांजरी पाळण्याचं प्रमाण वाढलंय. अगदी पाच ते दहा हजारापासून ते वीस लाखापर्यंतच्या मांजरी बाजारात मिळतात. काही जण तर फॅशन आणि स्टेटस म्हणून मांजरी पाळतात. मात्र आता मांजरीपासून रेबीजचा धोका निर्माण झालाय. मांजर चावल्यास रेबीज होऊ शकतो. तसेच मांजरांना होणारे आजार गंभीर असू शकतात. त्यातून एखादा नवीन व्हायरल आजार उत्पन्न होऊ शकतो. त्यामुळे या मांजरांची संख्या आता नियंत्रित करण्यासाठी नाशिक पालिका त्यांची नसबंदी करणार आहे. 

या मांजरीची प्रजनन क्षमता मोठी आहे. एक मांजर दहा ते पंधरा पिले जन्माला घालते.  नाशिक महापालिकेची लोकसंख्या साधारणत 30 लाखदरम्यान आहे. मात्र इथे मांजरांचीही संख्याही लक्षणीय वाढलीये. 

मांजरांची संख्या नियंत्रित करण्यासाठी नाशिक पालिकेनं नसबंदीची मोहीम हाती घेतली. पहिल्या टप्प्यामध्ये 606 मांजरांची नसबंदी करण्यात येणार आहे.  एका मांजरीच्या नसबंदीसाठी 1 हजार 650  रुपये महापालिका मोजणार आहे. यासाठी जवळपास दहा लाखांची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली. नागरिकांच्या आरोग्यासाठी ही मोहीम आवश्यक असल्याचं वैद्यकीय तज्ञांना वाटतं आहे.

एप्रिल महिन्यानंतर माजरांची नसबंदी करण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. मांजरीपासून उपद्रव्य करणाऱ्या तक्रारी आल्या असेल तर त्या ठिकाणी पालिका कारवाई करून करणार आहे. तसेच पाळीव मांजरांचीही नसबंदी करण्यात येणार आहे.