Rohit Patil on Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तासगाव-कवठे महांकाळ येथील एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी दिवंगत नेते आर. आर.पाटील यांच्याबाबत एक वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. सिंचन घोटाळ्याचा आरोपानंतर माझी खुली चौकशी करण्याच्या आदेशावर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी स्वाक्षरी केली होती. त्याबाबत मला माहिती नव्हतं, असं अजित पवारांनी म्हटलं होतं. अजितदादांच्या या आरोपांवर आता आर.आर.पाटील यांचे पुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार रोहित पाटील यांनी उत्तर दिलं आहे.
नऊ वर्षांनंतर आबांच्या बाबतीत,अशा पद्धतीने अजित पवारांकडून करण्यात आलेले वक्तव्य योग्य नाही,आज आबा असते तर याला त्यांनी उत्तर दिलं असतं, असं रोहित पाटील यांनी म्हटलं आहे. तसंच, मी अजित पवारांच्या सोबत असतो तर कदाचित त्यांनी हे वक्तव्य केलं नसतं,पण आपण त्यांच्यासोबत नाही आणि शरद पवारांच्या सोबत आहे,त्यामुळे कदाचित त्यांनी हे वक्तव्य केलं असेल, असा टोलाही रोहित पाटिल यांनी लगावला आहे. या मतदारसंघातल्या उमेदवाराला घराघरांमध्ये पोहोचवण्यासाठी देखील अजित पवारांकडून हे वक्तव्य झालं असावं, असं त्यांनी म्हटलं आहे.
अजित पवार यांच्यावर जलसंपदा मंत्री असताना राज्यात 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा केल्याचा आरोप आहे. आर आर आबांनी आपला केसाने गळा कापला, अश्या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा फाईल कशी तयार झाली. त्यावर आपली चौकशी करण्यासाठी आर आर आबांनी सही केली, असा दावा अजित पवारांनी केला आहे. आर. आर. पाटलांना प्रत्येक वेळी आधार दिला, पण आबांनी आपल्याला कामाला लावले, अशी खंत देखील अजित पवारांनी व्यक्त केली होती.
दरम्यान, तासगाव- कवठेमहांकाळ मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार रोहित आर. आर. पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ पार पडणार आहे. परंपरेप्रमाणे तासगाव तालुक्यातील ढवळी येथील गावातून रोहित पाटील आपल्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. यावेळी त्यांची सभा देखील पार पडणार आहे.