सरावासाठी जाताना बाईक थेट गाडीखाली आली अन्... पोलीस होण्याच्या स्वप्न पाहणाऱ्या तरुणाचा जागीच मृत्यू

Sangli Accident News : सांगलीत पोलीस भरतीच्या सरावाला निघालेल्या तरुणांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला. या अपघातात एक तरुण ठार तर तिघे जखमी झाले आहेत.

आकाश नेटके | Updated: Feb 25, 2024, 01:39 PM IST
सरावासाठी जाताना बाईक थेट गाडीखाली आली अन्... पोलीस होण्याच्या स्वप्न पाहणाऱ्या तरुणाचा जागीच मृत्यू title=

सरफराज मुसा सनदी, झी मीडिया, सांगली : पोलीस भरतीच्या सरावासाठी निघालेल्या तरुणांच्या दुचाकीला अपघात झाला. या अपघातात एक तरुण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना सांगलीच्या रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील  कळंबी या ठिकाणी घडली आहे. पोलीस होण्याचे स्वप्न बाळगून असलेल्या या तरुणाच्या मृत्यूने कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे. 

शिरीष अमसिद्ध खंबाळे (वय 21) असे मृत तरुणाचे नाव आहे. शिरीष हा त्यांच्या मित्रांसमवेत दुचाकीवरून रत्नागिरी-नागपूर मार्गावरील भोसे येथून पोलीस भरती प्रशिक्षणा सारवासाठी सांगलीतील जिल्हा क्रिडा संकुलाकडे सरावासाठी निघाला होता. यावेळी रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव पिकप वाहनाने मागून दोन्ही दुचाकींना जोरदार धडक दिली. यामध्ये शिरीष हा जागीच ठार झाला तर त्याचे अन्य तीन मित्र हे गंभीर जखमी झाले.

शिरीषच्या जखमी मित्रांना मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलीस भरतीची जिद्द बाळगून हे तरुण सराव करत होते. यापैकी आता एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. तर तिघांना गंभीरित्या दुखापत झाली आहे. या सर्वांना शासकीय मदत मिळावी,अशी मागणी करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस भरतीचा सराव करण्यासाठी दोन बाईकवरून पहाटेच्या सुमारास दोन दुचाकींवरुन चौघेही भोसे मधून सांगली क्रीडा संकुल येथे येत होते. रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कलंबीजवळ आले असताना त्यांच्या बाईकला मागून येणाऱ्या भरधाव पिकअप वाहनाने धडक दिली. या अपघातामध्ये शिरीष अमसिद्ध खंबाळे जागीच ठार झाला तर विश्वजीत विजय मोहिते (वय 24, रा. भोसे) प्रथमेश उत्तम हराळे (वय 24, रा. भोसे), प्रज्वल साळुंखे (वय, 24 रा. कसबे डिग्रज) हे गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर भोसे गावातील लोकांनी आणि पोलीस भरती सराव करणाऱ्या तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली.

नालासोपाऱ्यात एसयुव्ही कारच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू

नालासोपाऱ्याच्या सत्पाळा राजोडी रस्त्यावर एका भरधाव एसयूव्ही कारने रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या एका महिलेला जोरदार धडक दिली. त्यात त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. नवशी बसवत (65) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने गाडीतील दोन जणांना बेदम मारहाण करून गाडीची तोडफोड केली.अर्नाळा सागरी पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत दोन जणांना ताब्यात घेतले आहे. मृत महिला ही सत्पाळा नाका ग्रामपंचायत कार्यालया मागे राहत होती. शनिवारी संध्याकाळी राजोडी रान येथून कामावरून सुटल्यानंतर नवशी  आणखीन एक महिलेसोबत राजोडी भीम नगर येथील रस्त्यावरून सत्पाळा येथील घरी जात होती. त्यावेळी तिला कारने जोरदार धडक दिली. यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पळून जाणाऱ्या महेंद्रा कार मधील दोन जणांना स्थानिक ग्रामस्थांनी पकडून बेदम मारहाण केली. संतप्त जमावाने गाडीचीही तोडफोड केली. अर्नाळा पोलीस ठाण्यात याप्रकरणी चालक कुलदीप मिश्रा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.