Kalwa Hospital : ठाणे महापालिकेच्या (TMC) कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात (chhatrapati shivaji maharaj hospital) एका रात्रीत 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. 18 रुग्णांच्या मृत्यूसंदर्भात सखोल चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या (CM Eknath Shinde) आदेशानुसार कमिटी नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे सर्वपक्षीय नेत्यांनी रुग्णालया प्रशासन आणि सरकारला धारेवर धरलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही या घटनेबाबत रोष व्यक्त केला आहे. यासोबत मुख्यंत्र्यांसह सरकारची कानउघडणी केली आहे.
"ही अतिशय चिंताजनक प्रकारची गोष्ट आहे. हा प्रकार ठाण्यात घडला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्येही सार्वजनिक रुग्णालयात या प्रकारच्या घटना होत असतील तर राज्य कोणत्या दिशेने जात आहे याचा एक उत्तम नमुना बघायला मिळाला. जे मृत्यूमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. हा प्रकार टाळण्यासाठी शासनाने तातडीने कठोर पावलं उचलण्याची आवश्यकता आहे," असे शरद पवार यांनी म्हटलं आहे.
"दोन पैसे शेतकऱ्यांना मिळणार असल्यावर परदेशातून माल आणण्याची भूमिका केंद्र सरकार घेते. शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याच्या ऐवजी त्याला यातना कशा देता येतील हीच भूमिका राज्यकर्ते घेत आहेत. त्यामुळे अशा स्थितीत आयात करणे हे शेतकऱ्यांना दुःख पोहचवण्या सारखं आहे," अशीही टीका शरद पवार यांनी केली.
"कोर्टाच्या आदेशानंतरही नवाब मलिक यांना जेलच्या बाहेर सोडलेलं नाही. ते आज सुटण्याची शक्यता आहे. ते सुटल्यानंतर मी त्यांच्यासोबत संवाद साधणार आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रचंड लोकांचा प्रतिसाद होता आणि हेच ठिकठिकाणचे चित्र आहे. उद्या मी औरंगाबादला जाणार आहे. ना धो महानोर यांचे दुःखद निधन झाल्यामुळे त्यांच्या गावी जाऊन कुटुंबियांना भेटून येणार आहे. त्यानंतर प्राध्यापक विजय बोराडे यांच्याही कुटुंबियांना भेटणार आहे. हे संपल्यानंतर बीडला जाऊन एक जाहीर सभा घेणार आहे," असेही शरद पवार म्हणाले.
"जयंत पाटील यांच्या बंधुना नोटीस आल्याची माहिती माझ्या कानावर आलेली आहे. सत्तेचा गैरवापर करुन आमच्या काही सहकाऱ्यांना अशा नोटीस आल्या आहेत. ते भाजपमध्ये जाऊन बसले. आज तो प्रयत्न जयंत पाटील यांच्यासोबत सुरु आहे. पण त्यांची भूमिका स्पष्ट आहे," असे शरद पवार म्हणाले.