Sharad Pawar Resignation and NCP meeting : राष्ट्रवादी काँग्रेसची आज मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीत शरद पवार यांच्या निवृत्तीबाबत चर्चा होणार आहे. तसेच पुढील अध्यक्षाची चाचपणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कालच शरद पवार यांनी कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार केला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे तेच या पदावर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते आपला निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची शक्यता जास्त आहे. परंतु, शरद पवार हे लोकसभा निवडणुकीपर्यंत या पदावर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रथमच राष्ट्रवादीचा कार्याध्यक्ष निवडण्याची शक्यता जास्त आहे. कार्याध्यक्षपदी सुप्रिया सुळे यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. तशी आजच्या बैठकीत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याच्या अचानक केलेल्या घोषणेने राज्याच्या राजकारणाचा नूरच पालटून गेला आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठा मतदारांवर मजबूत पकड असलेला राष्ट्रवादी हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा पक्ष आहे. शरद पवार यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या राजकीय वर्तुळाला दे धक्का दिला आहे. शरद पवार यांनी जाहीर केले, ते राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होत आहेत. त्यानंतर कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात गोंधळ घातला. तुम्ही आपला निर्णय मागे घ्या असा आग्रह केला. काहींनी तर वाय बी चव्हाण सेंटरमध्ये ठिय्या मारला. दोन दिवसांपासून पवार यांची मनधरणी करण्यात येत होती. अखेर काल त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार केला जाईल, असे जाहीर केले. त्यानंतर कार्यकर्ते आणि पदाधिकारी शांत झालेत. यावेळी पवार यांनी दोन दिवसांचा अवधी मागून घेतला आहे.
मुंबईत आज राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीत शरद पवार यांच्या निवृत्तीनंतर काय यावर चर्चा होणार आहे. पक्षाला एकसंघ बाधून ठेवण्यासाठी काय काय करता येईल, याचाही विचार होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने शरद पवार यांच्यानंतर पक्षाची सूत्रे कोण संभाळणार याच्यावरही खल होण्याची शक्यता अधिक आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्याध्यक्ष पदाचा विचार होण्याची शक्यता आहे. यासाठी सुप्रिया सुळे यांचे नाव पुढे केले जाऊ शकते. कारण त्यांच्याकडे पवारांचा उत्ताराधिकारी म्हणून पाहिले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा नवीन राष्ट्रीय अध्यक्ष कोण असावा यासाठी आज 11 वाजता बैठक होणार आहे. मुंबईतील राष्ट्रवादीच्या मुख्यालयात ही बैठक होईल. शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर नवा अध्यक्ष कोण यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. शरद पवार यांनी अध्यक्षपद कायम ठेवावं अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केली आहे. तर पवार यांनी स्वतःच्या भूमिकेत बदल करण्याचं काल सूचक विधान केले आहे. त्यामुळे पवार यांच्या अध्यक्ष पदासोबत पार्टीत कार्याध्यक्ष पद निर्माण करत सुप्रिया सुळे यांची वर्णी लागणार का? की शरद पवार हे राजीनाम्याच्या भूमिकेवरच ठाम राहणार का ? याकडे लक्ष आहे. आज बैठकीत प्रफुल्ल पटेल हे प्रस्ताव सादर करणार असून राष्ट्रवादीचे नेते अनुमोदन देणार आहेत.
राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदासाठी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल इच्छुक नाहीत. त्यामुळे हे पद कोण घेणार याचीही उत्सुकता आहे. आज महत्त्वाची बैठक होत आहे. शरद पवार यांनी नवीन समिती गठीत केली आहे. या समितीची बैठक होत आहे. त्यासाठी अनिल देशमुख उपस्थित राहणार आहेत. शरद पवार यांनीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष राहिले पाहिजे अशी भावना सगळ्यांची आहे, असे ते म्हणाले.