नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहायला लोक तयार का नाही, लोक पक्ष सोडून का जातात, याचे आत्मचिंतन शरद पवारांनी केले पाहिजे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांवर पलटवार केला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक आमदार भाजपामध्ये येण्यास उत्सुक असून त्यापैकी निवडक लोकांना भाजपात घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
सरकारकडून ईडी, सीबीआय यांचा गैरवापर लोकप्रतिनिधींना धमकावण्यासाठी केला जात असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी केली. निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर वाढले असून पक्षांतर करण्यासाठी नेत्यांवर दबाव आणला जात असल्याचेही ते म्हणाले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी, पवार साहेबांच्या पक्षात लोक राहायला का तयार नाही? त्याचे आत्मचिंतन त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने केले पाहिजे असे म्हटले आहे.
भारतीय जनता पक्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक आमदार येण्यास तयार आहे. मात्र त्यांच्यापैकी काही निवडक लोकांनाच भाजपकडून घेण्यात येईल. ज्यांच्यावर ईडीची चौकशी सुरू आहे, अशांना भाजप घेणार नाही, आम्हाला अशा लोकांची आवश्यकता नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
भाजप कुणावर दबाव टाकून पक्षात या, म्हणायची वेळ भाजपवर वेळ आलेली नाही. जे चांगले लोक आहेत, जे लोकाभिमुख आहेत, त्यांतील निवडक लोकांनाच घेऊ असेही त्यांनी सांगतिले.
भाजपने दबावाचे राजकारण केले नाही. गेल्या पाच वर्षात त्यांच्या पक्षाचे अनेक साखर कारखाने अडचणीत आले, त्यावेळी सरकारच्या माध्यमातून त्यांना मदत केली असल्याची यादी मोठी आहे. अशी आठवणही मुख्यमंत्र्यांनी करुन दिली.