मुंबई: राज्य मंत्रिमंडळ विस्तारावरून शिवसेनेनं पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य केलं आहे. मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला काहीही नको. 'आम्हाला जे हवं ते आम्ही मनगटाच्या जोरावर मिळवतो', असा टोला परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी भाजपला लगावलाय. साताऱ्यातील पाटण येथील बस स्थानकाच्या नुतनीकरणाच्या शुभारंभाप्रसंगी रावते बोलतं होते. येत्या काही दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. या विस्तारात शिवसेनेलाही सहभागी करून घेतले जाईल की, हा विस्तार फक्त भाजपपुरताच मर्यादीत असेल, याबाबत उत्सुकता आहे. या पार्श्वभूमिवर रावते यांच्या विधानाला महत्त्व आले आहे.
दरम्यान, सत्तेत आल्यापासून शिवसेना भाजपमध्ये खणाखणी सुरू आहे. सत्तेचा पुरेपूर वापर करत भाजप शिवसेनेला नामोहरम करण्याचा प्रयत्न करत आहे. तर, सत्तेच्या घरात राहून वर्मावर बोट ठेवत शिवसेना भाजपचे वाभाडे दररोज काढत आहे. तसेच, शिवसेनेचे मुखपत्र सामनातूनही जोरदार 'सामना' रंगत असून, भाजपवर शाब्दिक बाण मारण्याची एकही संधी शिवसेना सोडत नाही.
अत्यंत पद्धतशीरपणे आखणी करत भाजपने शिवसेनेसोबतची युती २०१४मध्ये तोडली. त्याचा पुरेपूर फायदा घेत राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरण्याची कामगिरीही केली. पण, आता देशातील आणि राज्यातील राजकीय वातावरण कमालिचे बदलत आहे. त्यामुळे येत्या काळात (२०१९) सत्ता मिळवायची तर, एकटे लढून चालणार नाही. त्यासाठी शिवसेनेसारख्या समविचारी आणि तितक्याच तगड्या पक्षाची गरज असल्याचे भाजपच्या ध्यानात आले आहे. त्यामुळे यूतीसाठी भाजप घोड्यावर बसला आहे. पण, शिवसेनेने आगोदरच स्वबळाची घोषणा केल्याने ही युती होणार का, याबाबत राज्यालाच नव्हे तर, देशातील राजकीय वर्तुळाला उत्सुकता लागली आहे.