विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : राज्यात मान्सून दाखल झाला असला तरी मराठवाड्याच्या काही भागात अजूनही पावसाने जोर धरलेला नाही. त्यामुळे पेरण्या खोळंबल्यात. आता कमी पावसात येणाऱ्या पिकांवरच शेतकऱ्यांना जोर द्यावा लागणार आहे. पावसाच्या आगमनाची चिन्ह असताना आता शेतात लगबग पहायला मिळतेय. बळीराजा दुष्काळ झटकून पुन्हा एकदा आशेनं कामाला लागला आहे.
औरंगाबादच्या ढोरकीन गावातील शेतकरी सुनील थोरात सध्या वखरणीच्या कामात व्यस्त आहे. थोडा पाऊस आला, जमीन ओली झाली. मात्र अजूनही योग्य पेरणी झाली नाही. त्यामुळं वखरणी करून किमान पेरणीची तयारी तरी त्यांनी सुरु केली. एरव्ही ९ ते १२ जूनला येणारा पाऊस यंदा थेट २५ जूनच्या आसपास आला. त्यामुळं यंदा कपाशी लावता येणार नाही अशी त्यांना भीती आहे. त्यात पावसाचा काही नेम नाही. त्यामुळं कमी पावसात येणारी तूर आणि बाजरी लावणार असल्याचं त्याचं म्हणणं आहे.
मागचं वर्ष दुष्काळानं वाया गेलं, गेल्यावर्षी कपाशीवर ४० हजार खर्च केला मात्र हाती २० हजार आले. तर ऊसही फक्त जनावरांच्या चाऱ्याच्या कामी आला. त्यामुळं पावसाची प्रतिक्षा तर आहेच, मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळं कमी पाण्याचं पिकंच घ्यावं असा विचार त्यांच्या मनात सुरु आहे.
१०० मिमी पाऊस आल्याशिवाय पेरणी करू नये असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. तसंच कोणतं पीक घ्यावं याबाबतही तज्ञ्ज्ञांनी मार्गदर्शन केलं आहे.
औरंगाबाद जिल्हायात अजूनही पावसाची प्रतिक्षा कायम आहे. मोठा पाऊस आल्याशिवाय शेतकरी कामाला लागू शकत नाही. त्यामुळं बळीराजासह आता सगळ्यांचेच डोळे आभाळाकडे लागलेत. पाऊस आला तरच संकट हटेल आणि शेती फुलणार आहे.