Sudhir Mungantiwar: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा राज्याच्या राजकारण सुरू असतानाच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या दिल्ली दौऱ्याचीही चर्चा सुरू होती.दिल्ली दौऱ्यात मुनगंटीवार यांनी केंद्रातील अनेक दिग्गज नेत्यांच्या भेटी घेतल्या.त्यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक तर्क वितर्कांना उधाण आलंय.
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हे ठरत नसतानाच भाजपचे राज्यातील ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार दिल्ली दौऱ्यावर गेल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या.मुनगंटीवार यांचा दिल्ली दौऱ्यावर राजनाथ सिंह यांच्यासोबतच्या भेटीचा फोटोही समोर आला होता. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण याची चर्चा सुरु असताना सुधीरभाऊ गाठीभेटी घेत फिरत होते. त्यामुळं सुधीरभाऊ दिल्लीत पण महाराष्ट्रात चर्चा असा मामला झाला. दिल्ली दौऱ्यावरून परतल्याने सुधीर मुनगंटीवार दिल्ली दौऱ्याबाबत सारवासारव करताना दिसले.
मुख्यमंत्रीपदाचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवरून होतो. मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत असं सांगायलाही मुनगंटीवार विसरले नाहीत.
राज्यात मुख्यमंत्री कोण होणार आणि मंत्री कोण होणार याचा निर्णय दिल्लीवरून होणार हे महायुतीच्या नेत्यांनीच स्पष्ट केलंय. त्यातच मुनगंटीवर दिल्ली दौऱ्यावर गेल्यानं चर्चेला उधाण आलं होतं.. त्यामुळे दिल्ली दौऱ्यावर स्पष्टीकरण देण्याची वेळ सुधीर मुनगंटीवार यांच्यावर आलीय.
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असावा यावर झालेल्या बैठकीत संघाच्या वरिष्ठ नेत्यांचाही सहभाग होता. नेतृत्व कुणाकडं सोपवावं यावर सखोल चर्चा झाली.मुख्यमंत्रिपदासाठी एकदोन मराठा नेत्यांच्या नावांचाही विचार झाला.देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रिपदासाठी योग्य नेते असल्याचं सगळ्यांचं मत पडलं.संघाच्या नेत्यांनीही देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती दिली.दिल्लीतल्या या बैठकीत काही नावांवर चर्चा झाली. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि संघाच्या नेत्यांची पहिली पसंती देवेंद्र फडणवीस हेच राहिले. मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांचं नावच योग्य असल्याचा निष्कर्ष या नेत्यांनी काढल्याचं सांगण्यात येतंय.अमित शाहा आणि मोदींची ही चर्चा सुरु असतानाच एकनाथ शिंदेंचा मुंबईतून फोन आला. एकनाथ शिंदेंनीही भाजपनं मुख्यमंत्री ठरवावा आपण पाठिंबा देऊ अशी भूमिका घेतली. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या नावालाच दिल्लीतील भाजप वर्तुळात पहिली पसंती मिळालीय. दिल्लीतून नव्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांना हिरवा कंदिल मिळालाय. आता फक्त औपचारिक घोषणेची उत्सूकता आहे.