लोकसभेला थोडी गंमत केली, विधानसभेला गंमत करु नका, नाहीतर...; अजित पवार बारामतीकरांना स्पष्टच बोलले

Ajit Pawar News: घरातील दोन उमेदवार राहिले आहेत, लोकसभेला जो निकाल दिला त्या बाबत माझं काही म्हणणं नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 16, 2024, 09:00 AM IST
लोकसभेला थोडी गंमत केली, विधानसभेला गंमत करु नका, नाहीतर...; अजित पवार बारामतीकरांना स्पष्टच बोलले title=
Support me in the assembly Election Ajit Pawars emotional appeal to baramatikars

Ajit Pawar News: 'तुम्ही लोकसभेला थोडी गंमत केली, आता मात्र तुम्ही विधानसभेला गंमत करु नका नाहीतर तुमची जम्मतच होईल. मी खोटं सांगत नाही,' असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. आज अजित पवारांची पानसरेवाडी येथे सभा झालीय. या सभेत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. तसंच, लोकसभेत झालेल्या मतदानाबाबतही त्यांनी भाष्य केलं आहे. 

'लोकसभा निवडणुकीच्यावेळी तुम्ही साहेबांकडून पाहून सुप्रियाताईंना मतदान केलं. त्याबद्दल मी काही म्हटलं नाही तो तुमचा अधिकार होता तो तुम्ही पार पडला. पण यावेळी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला बरीच कामं करायची आहेत. आपल्याला पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आणायचं आहे. तुम्ही नेहमीच मला साथ दिली तुम्ही घड्याळालाच मतदान करत आला आहात. लोकसभेला तुम्ही थोडी गंमत केली. आता मात्र तुम्ही विधानसभेला गंमत करु नका. नाहीतर तुमची जम्मतच होईल. मी खोटं नाही सांगतं. तुमच्या लक्षात येत नाही काही भावनिक करायचा प्रयत्न केला तर त्याची इतकी मोठी किंमत बारामतीकरांना मोजावी लागेल. बारामतीकरांना कोणी वाली राहणार नाही. साहेबांनी सांगितलं दीड वर्षांनी निवडणुकीला उभं राहणार नाही आणि पुन्हा खासदार पण होणार नाही. त्याच्यानंतर कोण बघणार आहे याचा विचार करा. कोणात इतकी धमक आहे, ताकद आहे कोण शब्दाचा पक्का आहे. एवढे आमदार आहेत पण कोणी करोडो रुपये त्या त्या भागात घेऊन आले नाहीत,' असं अजित पवारांनी म्हटलं आहे. 

'यावेळेस मात्र चांगल्या पद्धतीने तुम्ही मतदान करावं, अशी माझी आग्रहाची विनंती आहे. आमच्या सगळ्या वडीलधाऱ्यांना, माय माउलींनी विनंती आहे. पुढीची अजून राहिलेली कामंदेखील होतील. खरं तर बोलू नये पण मी ज्यांना पदं दिली तीच माझ्याविरोधात गेली. यातीलच गंमतीचा भाग जाऊद्यात. तरुणांनो मला साथ द्या मी तुम्हाला संधी देतो. बारामतीला पुढे नेण्याचं काम कोण करु शकतं याचा नीट विचार केला. भावनिक राजकारणाला बळी पडू नका. खरंच बारामतीत एवढ्या निवडणुका लढवल्या पण वेगळे प्रकार बारामतीत घडतं नव्हते,' असंही अजितदादांनी म्हटलं आहे. 

'लोकसभेला बरेच लोक म्हणायचे लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा आता दिवस कमी राहिले आहेत. या गावात सुनेत्रा ला मते 30 टक्के आणि सुप्रियाला 60 टक्के मते होती. यावेळेस चांगल्या पद्धतीने मतदान करावं ही विनंती. पानसरे वाडीतील लोकांना जाऊन नमस्कार करावे म्हणून आलोय,' असं अजित पवारांनी म्हटलं आहे.