TAIT Exam News : डीएड, बीएडच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर आहे. TAIT परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे. (Maha TAIT Exam 2023) शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा (Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येत आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) 2022 जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र' या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT)- 2022 या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.
गेल्या पाच वर्षांत दुसरी TAIT Exam घेतली नव्हती ती आज जाहीर झाली आहे. खर तर पहिली परीक्षेनंतर दुसरी परीक्षा सहा महिन्याने व्हायला पाहिजे आणि त्यानंतर चार महिन्याने परीक्षा होणे आवश्यक होते. मात्र, आज ही दुसरी TAIT जाहीर झाली. यासाठी वेळोवेळी युवाशाही संघटना पाठपुरावा करत होती. अखेर त्यांना यश आले. यासाठी संघटनेने मुंबईत जलसमाधी आंदोलनाचा इशारा देखील दिला होता.आता ही परीक्षा दिलेल्या वेळापत्रकानुसार होणार आहे, अशी माहिती युवासाही संघटनेकडून देण्यात आली.