नवजात बाळ रडू नये म्हणून तोंडाला चिकटपट्टी लावली, महापालिकेच्या रुग्णालयातील संतापजनक प्रकार

भांडुपमधील मुंबई महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसूतीगृहात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. लहान मुलं रडू नयेत म्हणून तोंडाला चिकटपट्टी लावल्याचे समोर आले आहे. 

Updated: Jun 8, 2023, 02:10 PM IST
नवजात बाळ रडू नये म्हणून तोंडाला चिकटपट्टी लावली, महापालिकेच्या रुग्णालयातील संतापजनक प्रकार title=
tape was applied on the mouth of the newborn baby to prevent from crying in bhandup bmc hospital

भांडुपः भांडुपमधील (Bhandup) मुंबई महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसूतीगृहामध्ये (BMC Run Muncipal Hospital) एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लहान मुलं रडू नयेत म्हणून त्यांच्या तोंडाला चिकटपट्टी लावल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. प्रसूतीगृहात काम करणाऱ्या परिचारिकांकडूनच हा प्रकार केला जात असल्याचे उघडकीस आले आहे. 

रुग्णालयात धक्कादायक प्रकार

सावित्रीबाई फुले प्रसूतीगृहातील रुग्णालयात काही दिवसांपूर्वी प्रिया कांबळे या महिलेची प्रसूती झाली होती. बाळाला कावीळ झाली असल्यामुळे त्याला एन.आय.सी.यूमध्ये ठेवण्यात आलं होतं. बाळाला पाहण्यासाठी प्रिया कांबळे जेव्हा या एनआयसी युनिटमध्ये आल्या त्यावेळी त्यांच्या बाळाच्या तोंडामध्ये चोखणी देऊन त्याचं तोंड चिकटपट्टीने बंद करण्यात आलं होतं. हा प्रकार पाहताच त्यांना धक्का बसला.

बाळाच्या तोंडाला चिकटपट्टी लावल्याचे पाहताच त्यांनी यासंदर्भात तिथल्या परिचारिकांना जाब विचारला. तेव्हा त्यांनी बाळ रडत असल्यामुळे बाळाच्या तोंडाला चिकटपट्टी लावली जात असल्याचं सांगितले. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी रुग्णालय प्रशासनाकडे याची तक्रार केली आहे. 

बाळाच्या तोंडाला चिकपट्टी लावली

प्रिया यांनी हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर तिथे कार्यरत असलेल्या परिचारिकेला जाब विचारत ही टेप का लावली असा प्रश्न केला. त्यावर त्यांनी त्याला काय होतं. हे नॉर्मल आहे, असं उलट उत्तर केलं. तसंच, बाळ रडून लाल झालं होतं मात्र त्याच्या तोंडाला पट्टी लावल्याने त्याच्या रडण्याचा आवाजही बाहेर पोहोचत नव्हता. रुग्णालयातील सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रिया काबंळे यांनी तात्काळ तिथून डिस्चार्ज घेत बाळाला ठाणे येथील रुग्णालयात दाखल केले. तसंच, घडलेला प्रकार नातेवाईकांनाही सांगितला. 

एक परिचारिका निलंबीत

दरम्यान, याच सावित्रीबाई फुले प्रसूतीगृहामध्ये एन.आय.सी.यू युनिटमध्ये दाखल करण्यात आलेली नवजात मुले दगावल्याची घटना समोर आली होती. परंतु तरीदेखील रुग्णालय प्रशासनाकडून याची गंभीर दखल घेण्यात आली नव्हती. हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर या एनआयसी युनिटमध्ये कार्यरत असलेल्या सविता भोईर या परिचारिकेला निलंबित करण्यात आलं आहे. तसेच एका परिचारिकेला कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली आहे

रुग्णालयाबाबत अनेक तक्रारी

इतकेच नव्हे तर बाळाची दुपटी, डायपरही वेळेवर बदलले जात नाहीत. बाळंतपणासाठी आलेल्या महिलांनाही चांगली वागणूक मिळत नाही. तसंच, नवजात बाळांना दूधही नीट पाजले जात नाहीत, अशा तक्रारी या रुग्णालयाबाबत केल्या आहेत.