'अजय देवगणने फार मोठी चूक केली', आमीर खान स्पष्टच बोलला, म्हणाला 'उगाच टक्कर...'

'भूल भुलैय्या 3' आणि 'सिंघम अगेन' हे दोन्ही चित्रपट 1 नोव्हेंबरला दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाले आहेत. बॉक्स ऑफिसवरील स्पर्धेत कार्तिक आर्यनचा भूल भुलैय्या 3 बाजी मारताना दिसत आहे.   

शिवराज यादव | Updated: Nov 18, 2024, 07:41 PM IST
'अजय देवगणने फार मोठी चूक केली', आमीर खान स्पष्टच बोलला, म्हणाला 'उगाच टक्कर...' title=

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर बॉक्स ऑफिसवर 'भूल भुलैय्या 3' (Bhool Bhulaiyaa 3) आणि 'सिंघम अगेन' (Singham Again) हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. अनीस बज्मी यांनी 'भूल भुलैय्या 3' चं दिग्दर्शन केलं असून यामध्ये कार्तिक आर्यन, विद्या बालन, माधुरी दीक्षित प्रमुख भूमिकेत आहेत. दुसरीकडे सिंघम अगेनमध्ये अजय देवगण प्रमुख भूमिकेत असून कलाकारांची फौज आहे. दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. पण तीन आठवड्यांनंतर सिंघमच्या तुलनेत भुल भुलैय्या वरचढ ठरला आहे. अनेकांना रोहित शेट्टीने 'सिंघम अगेन'ला भुल भुलैय्यासह रिलीज करुन चूक केल्याचं वाटत आहे. हे वाटणाऱ्यांमध्ये आमीर खानदेखील (Aamir Khan) आहे. 

आमीर खान नेमकं काय म्हणाला?

व्हायरल झालेल्या एका व्हिडीओत आमीर खान अनीस बज्मी यांना सांगत आहे की, "त्यांनी तुमच्या भूल भुलैय्याशी टक्कर घेऊन चूक केली आहे".

Sacnilk.com नुसार बॉक्स ऑफिसवर 17 दिवसांनंतर भूल भुलैयाने 231.4 कोटी ची कमाई केली आहे. दरम्यान, सिंघम अगेनने 231.26 कोटी जमा केले आहेत.

या महिन्याच्या सुरुवातीला, 'हिंदुस्तान टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत, सिंघम अगेनच्या तुलनेत भूल भुलैया 3 ने जास्त कमाई केल्यासंदर्भात भाष्य केलं होतं. “हा एक मिनिटाचा आकडा आहे. एवढ्या छोट्या गोष्टीने काही फरक पडत नाही. एखादा चित्रपट 2 रुपये जास्त कमाई करतोय आणि एखादा नाही. महत्त्वाचं हे आहे की, दोन्ही चित्रपटांनी चांगला व्यवसाय केला आहे आणि थिएटरमध्ये मोठी गर्दी खेचून आणली आहे". 

अजय देवगण व्यतिरिक्त, सिंघम अगेनमध्ये करीना कपूर, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, अर्जुन कपूर, अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ आहेत.

दरम्यान, 'भूल भुलैया 3' हा प्रियदर्शन यांनी 2007 मध्ये सुरु केलेल्या हॉरर कॉमेडी फ्रँचायझीचा तिसरा भाग आहे. कार्तिकने 2022 मध्ये रिलीज झालेल्या 'भूल भुलैया 2' मध्ये रूह बाबा म्हणून मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटात विद्या बालन, माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी यांच्याही भूमिका आहेत.