नागपूर : परिसरातील अनेकांच्या भीतीचे कारण ठरलेल्या आणि विदर्भात धुमाकुळ घालणाऱ्या नरभक्षक वाघिणीचा अखेर मृत्यू झाला आहे. वीजेचा धक्का बसल्याने शनिवारी सकाळी या वाघिणीचा मृत्यू झाला. ही घटना बोर अभयअरण्याच्या हद्दीत घडली.
ही वाघिण नरभक्षक असल्याने तिला ठार मारण्यात यावे असे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. चार महिन्यांचा प्रवास करून ही वाघिण परतली होती. टी-२७ अशी ओळख असलेली ही वाघिण नरभक्षक होती. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या वाघिणीला ठार मारण्याच्या आदेशावर शिक्कामोर्तब केलं होतं. मात्र वन्यजीव प्रेमी या निकालाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेण्याची तयारी चालवली होती. मात्र, त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.
दरम्यान, उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात ही वाघिण 'जंगलात असो वा बाहेर', तिला ठार मारा असे म्हटले होते. ही वाघिण नरभक्ष असल्याचे वन विभागानेही जाहीर केले होते. वनविभागाचा अहवाल पाहूनच न्यायालयाने तिला ठार मारण्याचे आदेश दिले होते. वन विभागाच्या वकिलांनी माहिती देताना म्हटले होते की, ज्या ठिकाणी माणसांवर हल्ले झाले, तिथे हीच वाघीण असल्याचं सिद्ध झालं आहे, शिवाय दुसऱ्या कोणत्याही वाघाचं अस्तित्व तिथे नसल्याने या वाघिणीला ठार मारणं गरजेचं बनलं होतं, असंही या वकिलांनी म्हटले होते.