'...हीच हात जोडून नम्र प्रार्थना'; स्वबळाच्या नाऱ्यानंतर ठाकरेंच्या सेनेचा 'इंडिया'ला घरचा आहेर

UBT Shiv Sena Slams India Alliance: "देशासमोर प्रश्नांचा डोंगर उभा राहिला आहे. जनता त्रस्त आहे. तरीही मोदींचा भाजप विजयी होतो," असा उल्लेख लेखात आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 13, 2025, 06:42 AM IST
'...हीच हात जोडून नम्र प्रार्थना'; स्वबळाच्या नाऱ्यानंतर ठाकरेंच्या सेनेचा 'इंडिया'ला घरचा आहेर title=
ठाकरेंच्या शिवसेनेचा काँग्रेसवर हल्लाबोल

UBT Shiv Sena Slams India Alliance: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वबळावर लढण्याची घोषणा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं केली आहे. त्यानंतर इंडिया आघडी आणि महाविकास आघाडीचं काय चुकतंय यावर ठाकरेंच्या पक्षाने आता बोट ठेवलं आहे. काँग्रेसला आत्मपरिक्षणाचा सल्ला देताना ठाकरेंच्या पक्षाने 'इंडिया' आघाडीतील अनेक पक्षांना काँग्रेसचं नेतृत्व मान्य नसल्याचं मत व्यक्त केलं आहे. "देशात इंडिया आघाडी आणि राज्यात महाविकास आघाडी हे एक त्रांगडेच झाले आहे, अशी भावना लोकांत निर्माण झाली असेल तर त्यास जबाबदार कोण? या दोन्ही आघाड्या निर्माण झाल्या व कामास लागल्या तेव्हा आघाडीतील प्रत्येक घटक पक्षात आणि एकंदरीत जनमानसात उत्साह निर्माण झाला. देशावर लादलेला मनमानी कारभार, भ्रष्टाचार याविरुद्ध लढणारी एक शक्ती निर्माण झाल्याचा आत्मविश्वास भारतीयांत संचारला होता. देशात मोदींचा व महाराष्ट्रात बेकायदेशीर सरकारचा पराभव होऊ शकतो ही भावना विजेसारखी तळपू लागली, पण आता या दोन्ही आघाड्या निस्तेज आणि निष्क्रिय ठरत आहेत काय? देशासाठी हे बरे नाही," असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.

काँग्रेसचे नेतृत्व काहींना मान्य नाही...

"नॅशनल कॉन्फरन्स इंडिया आघाडीचा सदस्य आहे. या पक्षाचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी याच विषयावर बॉम्ब टाकला आहे की, इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीपुरतीच जन्मास आली. आता गरज संपल्याने इंडिया आघाडी बरखास्त केली पाहिजे. या आघाडीकडे ना कोणता खास कार्यक्रम, ना नेतृत्व. ज्युनियर अब्दुल्लांचे सूर जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री झाल्यावर बदलले आहेत. मुख्यमंत्री म्हणून त्यांना पंतप्रधान मोदी-अमित शहांची कृपादृष्टी लागणार आहे. कारण जम्मू-कश्मीर केंद्रशासित राज्य बनले हे खरे असले तरी अब्दुल्लांची विधाने नाकारता येणार नाहीत. अब्दुल्ला म्हणतात, इंडिया आघाडीची शेवटची बैठक 1 जून 2024 ला झाली होती. त्यानंतर हरयाणा, जम्मू-कश्मीर, महाराष्ट्र, झारखंडच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत काँग्रेसला मोठी झेप घेता आली नाही. हरयाणा आणि महाराष्ट्रात काँग्रेसला चांगलाच पराभव पत्करावा लागला. त्यानंतर इंडिया आघाडीच्या अस्तित्वावर प्रश्न विचारले जाऊ लागले. ममता बॅनर्जी यांनी तर जाहीरपणे सांगितले की, ‘इंडिया आघाडी’ मीच बनवली आणि आता संधी मिळाली तर या आघाडीचे नेतृत्व करायला मी तयार आहे. याचा दुसरा अर्थ काँग्रेसचे नेतृत्व काहींना मान्य नाही. त्यामुळे इंडिया आघाडीचा वृक्ष बहरताना दिसत नाही. लालू यादव यांनीही तीच समांतर भूमिका मांडली," असं 'सामना'च्या अग्रलेखातून म्हटलं आहे.

काँग्रेस अनेक राज्यांत स्वबळावर लढू शकत नाही, पण...

"पहिल्या इंडिया आघाडीच्या बैठकीचे यजमानपद नितीश कुमार यांनी पाटण्यात स्वीकारले. त्या पहिल्याच बैठकीत नितीशबाबूंनी भाजपची विचारधारा व मोदींच्या हुकूमशाहीविरुद्ध एकजुटीने लढण्याचा मंत्र दिला, पण इंडिया आघाडीचा हा मजबूत शिलेदारच मोदींना सामील झाला. पंजाब आणि दिल्लीत आप व काँग्रेस एकमेकांविरुद्ध उभे आहेत. केरळात काँग्रेस आणि डाव्यांची लढाई आहे. पश्चिम बंगालात तृणमूलविरुद्ध काँग्रेसचा सामना चालूच राहणार आहे व त्यास पर्याय नाही. कारण प्रत्येक प्रादेशिक पक्षाला आपापली भूमिका, कार्यकर्ते व अस्तित्व टिकवायचेच आहे आणि काँग्रेस पक्ष हेच समजून घ्यायला तयार नाही. काँग्रेस अनेक राज्यांत स्वबळावर लढू शकत नाही. तेवढे लढण्याचे बळ नाही, पण प्रादेशिक पक्षाच्या ताटातील वाटीत बोटे घालणेही सोडत नाही," असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे.

वाजपेयी, अडवाणी आणि फर्नांडिस यांची आठवण

"महाराष्ट्रासारख्या राज्यात त्याचा परिणाम पाहायला मिळाला. एक सत्य स्वीकारायला हवे ते म्हणजे भाजपच्या गुहेत शिरलेल्या मित्रपक्षांचा सुपडा साफ झाला. त्या वृत्तीने काँग्रेसने वागता कामा नये. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे व राहील. त्याबाबत कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेने काँग्रेससह सगळ्याच भाजप विरोधकांत नवी ऊर्जा निर्माण केली. आता प्रियंका गांधीही आल्या. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे अनुभवी नेते आहेत, पण इंडिया आघाडीत जो विस्कळीतपणा निर्माण झाला आहे तो सावरण्याची जबाबदारी कोणी घ्यायची? लोकसभेत काँगेसचे श्रीमान राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते आहेत व मोदींच्या हुकूमशाही आणि भ्रष्टाचाराच्या किल्ल्यावर ते जोरदार प्रहार करीत आहेत. संसदेत एक असलेला विरोधी पक्ष बाहेर मात्र वेगवेगळय़ा मार्गांनी जातो. आज इंडिया आघाडीत असलेले काही पक्ष कधीकाळी ‘एनडीए’ म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचेही सदस्य होते. त्या आघाडीचा (तेव्हाच्या) अनुभव काय सांगतो? सत्ता असो अगर नसो, राष्ट्रीय प्रश्न निर्माण झाला की, दिल्लीत ‘एनडीए’ची बैठक बोलावली जात असे. अनेकदा प्रमोद महाजन, लालकृष्ण आडवाणी हे नेते त्या त्या राज्यात जाऊन तेथील पक्षप्रमुखांशी चर्चा करीत. ‘एनडीए’स एक भक्कम निमंत्रकदेखील होता. बराच काळ या पदावर जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारखा ज्येष्ठ नेता होता व सर्व घटक पक्षांच्या प्रमुखांशी हे निमंत्रक संवाद ठेवत चर्चा करत, बैठकांना सन्मानाने बोलवत. या बैठकांचे अध्यक्षस्थान कधी अटल बिहारी वाजपेयी, तर कधी लालकृष्ण आडवाणी स्वीकारीत. शिवाय अधूनमधून कधी चहापान, तर कधी जेवणावळी पार पडत. त्यामुळे त्या आघाडीतील नाते वरवरचे नव्हते, तर घरोब्याचे निर्माण झाले हे मान्य करावेच लागेल," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.

इंडिया आघाडी नेमकी काय करत आहे?

"इंडिया आघाडीत लोकसभेआधी हे चांगले वातावरण नक्कीच होते. पाटणा, बंगळुरू, दिल्ली, मुंबईसारख्या ठिकाणी जंगी बैठका झाल्या. अनेक घटक पक्षांनी आपापल्या राज्यात इंडिया आघाडीच्या बैठकांचे यजमानपद स्वीकारले. सर्व मस्तच चालले होते. लोकसभा निवडणुकीत उत्तम निकाल घेतल्यावर नंतर मात्र संवादाच्या नावाने ठणाणा अशी स्थिती निर्माण झाल्याचे मत घटक पक्ष व्यक्त करीत आहेत. डी. राजा यांच्यासारख्या ज्येष्ठ डाव्या नेत्यानेही आता हीच वेदना व्यक्त केली. या वेदनेची दखल शेवटी काँगेसलाच घ्यावी लागेल. देशासमोर प्रश्नांचा डोंगर उभा राहिला आहे. जनता त्रस्त आहे. तरीही मोदींचा भाजप विजयी होतो. हा विजय खरा नाही असे जनता सांगते. हे सर्व घडत असताना इंडिया आघाडी नेमकी काय करत आहे?" असा सवाल ठाकरेंच्या पक्षाने विचारला आहे. "पावसाळ्यात निर्माण झालेले गांडूळ किंवा बेडूक हे पावसाळा संपताच नष्ट होतात. निवडणुकीसाठी निर्माण झालेल्या ‘इंडिया’सारख्या आघाड्यांचे जीवन अल्प न ठरता ते सदैव राष्ट्रकार्यासाठी समर्पित असावे या मताचे आम्ही आहोत," असं लेखात म्हटलं आहे.

...हे काँग्रेसच्या संस्कृतीला शोभत नाही

"मोदी हे सत्तेचा गैरवापर करून अदानीसारख्या उद्योगपती मित्रांना अधिक धनवान करीत आहेत. मोदी हे सर्वच पक्षांतील भ्रष्टाचाऱ्यांना भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये टाकत आहेत. न्यायालये, निवडणूक आयोग, संसद, विधानसभा, संविधानाची प्रतिष्ठा मोदी काळात धुळीस मिळाली आहे. धर्मांधता व कट्टरवाद वाढवून लोकांची माथी भडकवून निवडणुका जिंकल्या जात आहेत. या सगळ्यांविरुद्ध जनतेच्या मनात रोष असतानाही ‘इंडिया’ गठबंधन एकमेकांत गाठ मारून स्वस्थ बसली असेल तर इतिहास तुम्हाला माफ करणार नाही. निवडणुका येतील, निवडणुका जातील, पण निवडणुका ‘हायजॅक’ करून देशावर ताबा मिळवणाऱ्या राजकीय माफियांविरुद्ध इंडिया आघाडीला लढ्याचा एल्गार पुकारावा लागेल व त्यासाठी हेवेदावे, जळमटे, कुरघोड्यांना पूर्णविराम देण्याची गरज आहे. दिल्लीत काँग्रेस आणि आपमध्ये निवडणुकीचा सामना होऊ शकतो, पण केजरीवाल यांना देशद्रोही ठरवून प्रचाराचा मुद्दा करणे हे काँग्रेसच्या संस्कृतीला शोभत नाही," असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे.

हीच हात जोडून नम्र प्रार्थना...

"काँग्रेस ‘अकेली’ मोदी वृत्तीचा पराभव करण्याची क्षमता राखत असेल तर त्यांना कोणीच रोखणार नाही. त्यांनी ते जरूर करावे. तरीही महाराष्ट्रासारखे राज्य माफिया पद्धतीने जिंकून भाजप व त्यांच्याशी संबंधित टोळी ते कोणत्या प्रकारच्या राजकारणावर विजयी होतात ते दाखवते. या विकृतीशी लढण्यासाठी ऐक्याची वज्रमूठ, इंडिया आघाडीस नेतृत्व आणि जमल्यास एक निमंत्रकही हवा. नपेक्षा सगळेच मुसळ केरात जाईल. ते होऊ द्यायचे काय याचा विचार अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनेच करायला हवा. तेव्हा संवाद ठेवा हीच हात जोडून नम्र प्रार्थना," असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.