'मराठी माणूस आणि भाषेसाठी शिवसेनेइतकं कोणीच केलं नाही'

प्रस्ताव पुराव्यानिशी अंतिम टप्प्यात असून लवकरच.... 

Updated: Jul 1, 2019, 02:05 PM IST
'मराठी माणूस आणि भाषेसाठी शिवसेनेइतकं कोणीच केलं नाही' title=

अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त होण्यासाठीचा प्रस्ताव पुराव्यानिशी अंतिम टप्प्यात असून लवकरच या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळेल अशी माहिती मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत दिली. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा विषय हा केंद्रीय मंत्रिमंडळापुढे आहे. शिवसेनेने जेवढे मराठी भाषा आणि मराठी माणसासाठी केलं आहे तेवढे कोणीही केलेलं नाही, असं ठाम मत त्यांनी मांडलं.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत टकले आणि शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला तावडे उत्तर देत होते. 

मराठी शाळांमध्ये प्रवेश वाढवण्यासाठी सरकारनं प्रयत्न करावेत,  इतर माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी सक्तीची करावी अशी मागणी विरोधकांनी यानिमित्तानं केली होती.  पण, सरकार थेट उत्तर देत नसल्याबद्दल विरोधकांनी नाराजी व्यक्त केली. 

दरम्यान या चर्चेला उत्तर दिल्यावर दिवाकर रावते यांनी बेगडी मराठी प्रेमाचे वाभाडे कढले. १७ जून ला विधानपरिषदमध्ये ५२ सदस्य उपस्थित होते, याबाबतचा हजेरी पट त्यांनी सभागृहात दाखवला. ५२ पैकी १९ सदस्यांनी मराठीत स्वाक्षऱ्या केल्या होत्या. यामध्ये सेनेमध्ये ११ पैकी ६ जणांनी इंग्रजीत स्वाक्षऱ्या होत्या याबद्दल रावते यांनी नाराजी व्यक्त केली.  

आग्रह करुनही आपलं नाव इंग्रजी उच्चाराप्रमाणे मराठीत आजही मंत्रालयात लिहिलं जात असल्याबद्दल रावते यांनी नाराजी व्यक्त केली. आजही कॅबिनेटंत्री असं म्हंटलं जात. तेव्हा मराठीबद्दल बेगडी प्रेम न दाखवता स्वतःपासून सुधारणा करण्याचा आग्रह दिवाकर रावते यांनी यावेळी धरला.