मुंबई: दक्षिण मुंबईत पुनर्विकासामुळं छोट्या खोल्यांनाही मिळणारा कोट्यवधींचा भाव पाहून अनेकांची नियत फिरू लागलीय. यामुळं चाळींतल्या ग्रामस्थ मंडळांच्या खोलीचे अस्तित्वच धोक्यात येवू लागलंय. अलिडकच्या काळात गावचं राजकारण या खोल्यांमध्ये शिरले आहे. त्यात आता ही खोली ज्याच्या नावावर गावकऱ्यांनी घेतली होती. त्यांच्या वारसांनी या खोल्या विकण्याचा घाट घातल्यानं या गावच्या खोल्यांमध्ये राहणाऱ्या तरूणांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
कोल्हापूरच्या आजरा तालुक्यातील मलिग्रे ग्रामस्थ मंडळाची बीडीडी चाळीतील ही खोली. या १८० चौरस फुटांच्या खोलीमध्ये त्या गावातून नोकरीसाठी आलेली तब्बल २१ जण राहतात. ४०-५० वर्षापूर्वी राज्याच्या ग्रामीण भागातून मुंबईत नोकरीसाठी आलेल्यांना एकट्यानं खोली घेणं शक्य नव्हतं, त्यामुळं गावातील लोकांनी एकत्र येवून मुंबईत अशा खोल्या घेतल्या आहेत. परंतू, तेव्हा कायदेशीर अडचणींमुळं आणि विश्वासानं एकाच व्यक्तीच्या नावावर खोल्या विकत घेतल्या गेल्या. सभोवती साऱ्या कापड गिरण्या असल्यानं लोअर परेलमधील डिलाईल रोडवर गाववाल्यांच्या तब्बल साडेतीनशे खोली आहेत. तर मुंबई आणि परिसरात ही संख्या 2 हजारांवर जाते. आतापर्यंत गावातून नोकरीसाठी मुंबईत आलेल्या प्रत्येक तरूणाला ओसरी पसरायला जागा या खोलीने दिलीय. परंतु बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे वारे वाहू लागले आणि इथल्या घरांना कोटींचे भाव मिळू लागले. परिणामी ज्यांच्या नावावर या खोली आहेत, त्यांच्या वारसांनी त्या विकण्याचे मनसुबे आखलेत. परंतु याविरोधात इथं राहणारे तरूणही एकवटले आणि गावीही मोर्चे निघू लागलेत.
दोन भाऊ एका घरात राहू शकत नसले तरी २५-३० जण एका रुममध्ये इथं राहतात. पूर्वजांनी घातलेल्या अलिखित नियमांचे काटेकोर पालन केलं जात असलं तरी सध्या गावचे राजकारण या खोल्यांमध्ये घुसू लागलंय. परंतू, या नव्या संकटामुळं अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी सर्वांना एकत्र आणलंय. कुठल्याही कामासाठी गावाकडून मुंबईत येणाऱ्यांना ही खोली आसरा आहे. गावची खोली असल्यानं अत्यल्प खर्चात राहण्याची सोय होत असल्यानं हजारो तरूण तुटपुंज्या पगारातही त्यांना मुंबईत नोकरी करणं शक्य झालंय. नव्या संकटामुळं ते धास्तावले असले तरी त्यांनी हिंमत हरलेली नाही.