... तर हिंदू धर्माचाच त्याग करेन: मायावती

देशात होऊ शकतात मुदतपूर्व लोकसभा निवडणुका - मायावती

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Dec 11, 2017, 08:34 AM IST
... तर हिंदू धर्माचाच त्याग करेन: मायावती title=

नागपूर : देशात भाजपप्रणीत मोदी सरकार अस्तित्वात आल्यापासून हिंदू धर्मातील वर्णव्यवस्था अधिक प्रभावी ठरताना दिसत आहे. मी डॉ. बाबासाहेबांची अनुयाई आहे. डॉ. आंबेडकरांनीही हिंदू धर्मात सुधारणा होण्यासाठी वेळ दिला होता. त्यानुसार मीसुद्धा हिंदू धर्मातील शंकराचार्य आणि इतर प्रमुखांना तशी संधी देत आहे. मात्र, संधी देऊनही जर, हिंदू धर्मात सुधारणा झाली नाही, तर मलाही हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्विकारावा लागेल. आणि तो मी स्विकारेन, असे परखड मत बहुजन समाजवादी पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी नागपूर येथे व्यक्त केले.

लोकसभेसाठी बसपाची मोर्चेबांधणी

मुदतपूर्व लोकसभा निवडणुकीची शक्यता विचारात घेऊन मायावतींनी मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केली आहे. त्यासाठी त्या देशभरात सभा आणि कार्यकर्ता मेळावे घेत आहेत. त्यासाठी त्यांनी नागपूरच्या  कस्तुरचंद पार्कमध्ये रविवारी सभा घेतली. या सभेत त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा असे स्पष्ट आदेश पक्ष कार्यकर्त्यांना दिले. या वेळी बोलताना मायावतींनी लोकसभा निवडणुका मुदतपूर्व होण्याची शक्यताही व्यक्त व्यक्त करतानाच, भाजपला कमकुवत करण्याचे आवाहनही त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केले.

मागासवर्ग आयोगावरून कठोर टीका

मागासवर्ग आयोगाला संवैधानिक दर्जा देण्याबाबतच्या सरकारच्या भूमिकेवरूनही मायावतींनी तीव्र शब्दांत टीका केली आहे. केंद्रात मोदींचे सरकार येऊन साडेतीन वर्षे झाल्यावर या सरकारला मागासवर्ग आयोगाची आता आठवण आली आहे. ही सगळी पुढील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही राजकीय खेळी आहे. यातून ओबीसींना काहीही लाभ होणार नाही, अशी टीका मायावती यांनी केली.

प्रामाणिक आहे तर, भाजप पळ का काढतो..?

दरम्यान, इव्हीएम मशीनने मतदान करण्याच्या प्रक्रियेवर आक्षेप घेत पहिल्यासारखी बॅलेटपेपरद्वारे मतदान घेण्यात यावे अशी मागणीही मायावती यांनी या वेळी केली. भाजप स्वत:ला प्रामाणिक असल्याचे सांगतो तर, मग मतपत्रिकेद्वारे मतदान या मुद्द्यावर पळ का काढतो? असा सवालही मायावतींनी विचारला. मंत्रालयात कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरती केली जात आहे. आरक्षित जागा भरल्या जात नाहीत. सीबीआय आणि प्राप्तीकर खात्याचा गैरवापर केला जात आहेत. तसेच, भाजपमधील नेत्यांच्या भ्रष्टाचारावर पांघरून घालण्याचा प्रकार होत आहे, अशीही टीका मायावतींनी केली आहे. सध्या अणिबाणीपेक्षाही भयानक स्थिती आहे, असा आरोप मायावतींनी केला.