सांगलीच्या पूरक पोषण आहाराच्या झी २४ तासच्या बातमीची महिला व बालविकास मंत्र्यांकडून दखल घेण्यात आली आहे. आदिती तटकरे यांनी पूरक पोषण आहाराबाबत 48 तासांत अहवाल मागवला आहे. आदिती तटकरे यांनी दोषी आढळल्यास ठेकेदारांचा ठेका रद्द करणार असल्याचं जाहीर केलं आहे. सांगलीच्या पलूस येथे गर्भवती माता आणि बालकांना देण्यात येणाऱ्या पूरक पोषण आहारात चक्क मृत वाळा साप आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.
महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास योजने अंतर्गत गर्भवती माता आणि बालकांना वाटप करण्यात आलेल्या पोषण आहारात वाळा जातीच्या सापाचं मृत पिल्लू आढळून आलं होतं. पलूस येथील एका अंगणवाडीमधून डाळ, तांदूळ, तिखट, मीठ एकत्र असणारे पॅकेटचे वाटप करण्यात आले होते. ज्यामध्ये माजी सैनिक सुभाष निवृत्ती जाधव यांनी आपले नातू शिरीष याच्यासाठी आलेला पूरक पोषण आहार घरी नेला होता. आहाराचे पॅकेट उघडल्यानंतर त्यामध्ये मृत वाळा साप आढळून आला. जाधव यांनी या सर्व प्रकाराची माहिची अंगणवाडी सेविकांना दिली.
महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सहा महिन्यांपासून तीन वर्षांच्या बालकांसाठी आणि गर्भवती महिलांसाठी सुदृढ आरोग्य रहावे, या दृष्टीने पूरक पोषण आहार वाटप करण्यात येतो. मात्र या पोषण आहारात मृत साप आढळल्याने चांगलीच खळबळ उडाली. नुकतंच राज्य सरकारकडून एकाच ठेकेदाराकडे हा पूरक पोषण आहार वाटपाचा ठेका देण्यात आला होता. त्या माध्यमातून आलेल्या या पूरक पोषण आहारात वाळा साप मृत अवस्थेत आढळून आल्याने या आहाराच्या गुणवत्तेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.
"एक तर हा विभागाचा आग्रह नाही. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार न्यूट्रिशन देणं किंवा आहार पोहोचवणं हे केंद्र शासनाच्या सूचनेनुसार आहे. तो पोषण आहाराचा एक भाग आहे. ही त्यांची जबाबदारी असते, ही एक योजना असून हा वैयक्तिक विषय नाही. ही जबाबदार आहे," असं आदिती तटकरे यांनी झी 24 तासशी बोलताना सांगितलं.
पुढे त्या म्हणाल्या की, "विश्वजीत कदम यांनीही माझ्याशी यासंदर्भात संपर्क साधला. मला माहिती मिळताच त्वरित जिल्हातील अधिकाऱ्यांना 48 तासात पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पंचनामा केल्यानंतर इतर कोणत्याही पाकिटात काही सापडलं नसल्याचं सांगण्यात आलं आहे. संबंधित अंगवणाडीमधील आहाराचा पंचनामा करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. पंचनामा झाल्यानंतर, अहवाल आल्यानंतर संबंधित ठेकेदार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल".