पुणे : एक नवा मस्त कॅफे सुरू झालाय. पुण्यातल्या तरुणांनाही हा कॅफे आवडू लागलाय. काय हटके आहे या कॅफेत. पुण्यातला हा नवा कॅफे. याचं नाव वर्डस अँड सिप. एखादं आवडीचं पुस्तक घ्यावं. हातात वाफाळता चहा घ्यावा आणि चहाचे घोट घेत घेत पुस्तक वाचावं किंवा कॉफी घेत घेत प्रोजेक्ट पूर्ण करावं. एकदम मस्त आयडिया.
या कॅफेच्या जन्माची कथाही भन्नाट आहे. इजाज , प्रदीप आणि देविदास. ग्रामीण भागातून स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी पुण्यात आलेली ही तिकडी. तीन चार वर्षे या तरुणांनी शासकीय सेवांमध्ये भरती होण्यासाठी नशीब आजमवलं. मात्र त्यात अपयश आल्यानंतर व्यवसायाचा मार्ग निवडला. त्यातूनच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्य़ा विद्यार्थ्यांसाठी रिडर्स क्लब नावाने अभ्यासिका सुरु केल्या.
त्यातूनच बुक कॅफेची संकल्पना त्यांना सुचली आणि उभा राहिला हा वर्डस अॅंड सिप कॅफे. या कॅफेत वाचकांना पुस्तकांबरोबरच चहा कॉफीचा आस्वादही घेता येतो. तोही अगदी नाममात्र शुल्कात.
या कॅफेत चहा, कॉफीबरोबर इंटरनेटचीही सोय आहे. या कॅफेत तीन ते साडेतीन हजार मराठी आणि इंग्रजी पुस्तकं आहेत. जी वाचण्यासाठी अगदी अत्यल्प दरातूल टोकन घ्यावं लागतं.. या एकदा टोकन घेतलं की तीन तास तुम्ही या कॅफे मध्ये घालवू शकता.याच किमतीत काही खाद्यपदार्थांचे पर्याय देखील उपलब्ध आहेत.
पुण्यातल्या या बुक कॅफेला चांगला प्रतिसाद मिळतोय. पुस्तकांबरोबरच वेगवेगळ्या लेखकांशी गप्पा , पुस्तक प्रकाशन यासारखे कार्यक्रमही येथे आयोजित केले जातात.. त्यामुळे या बुक कॅफेजना ग्रंथालयांची नेक्ट जनरेशन म्हटलं तर हरकत नाही.