मध्य रेल्वेने 19 जानेवारी 2025 रोजी मुंबई लोकलच्या माटुंगा-मुलुंड आणि ट्रान्स-हार्बर मार्गांवर मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. सकाळी 11.30 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत देखभालीच्या कामामुळे रेल्वे सेवा विस्कळीत राहतील. माटुंगा-मुलुंड स्टेशनदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सकाळी 10.58 ते दुपारी 3.10 दरम्यान सुटणाऱ्या जलद गाड्या माटुंगा येथे डाउन स्लो मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या माटुंगा आणि मुलुंड दरम्यानच्या सर्व स्लो मार्गावरील स्थानकांवर थांबतील आणि मुलुंड येथे पुन्हा जलद मार्गावर सामील होतील. या गाड्या त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचण्यास सुमारे 15 मिनिटे उशिराने येतील.
सकाळी 11.25 ते दुपारी 3.27 दरम्यान ठाण्याहून सुटणाऱ्या जलद गाड्या मुलुंड येथे अप स्लो मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या मुलुंड आणि माटुंगा दरम्यान धीम्या मार्गावरील स्थानकांवर थांबतील आणि नंतर माटुंगा येथे अप फास्ट मार्गावर परत येतील. या गाड्यांमध्येही 15 मिनिटांपर्यंत विलंब होईल.
सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 या दरम्यान ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यानच्या सर्व अप आणि डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा या काळात तात्पुरत्या स्वरूपात बंद राहतील.
सकाळी 10.35 ते दुपारी4.07 दरम्यान ठाणे ते वाशी/नेरुळ/पनवेल येथे जाणाऱ्या सर्व सेवा रद्द राहतील. तसेच सकाळी 10.25 ते दुपारी 4.09 दरम्यान पनवेल/नेरुळ/वाशीहून ठाणेला जाणाऱ्या सर्व सेवा रद्द राहतील.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना या मेगा ब्लॉकला लक्षात घेऊन त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्याची विनंती केली आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, पायाभूत सुविधांची सुरक्षितता आणि विश्वासार्हता सुधारण्यासाठी हे काम अत्यंत महत्त्वाचे आहे. गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत, असे सांगत रेल्वेने प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. ही कामे पूर्ण झाल्याने गाड्यांची सेवा आणि रचना सुधारेल, असे आश्वासनही अधिकाऱ्यांनी दिले आहे.