SSC Board Exams 2025 : महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या दहावी बोर्डाच्या परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून, या परीक्षेसाठी हजारो विद्यार्थ्यांची तयारी आता अंतिम टप्प्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. याच परीक्षेच्या धर्तीवर अतिशय महत्त्वाची माहिती नुकतीच समोर आली असून, विद्यार्थ्यांना नेमकं हॉलतिकीट केव्हा दिलं जाणार यासंदर्भातील तारीख समोर आली आहे.
उपलब्ध माहितीनुसार दहावीच्या परीक्षेसाठीचं हॉल तिकीट सोमवारपासून मिळणार आहे. ऑनलाइन पद्धतीनं हे हॉल तिकीट उपलब्ध असेल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेचं हॉल तिकीट 20 जानेवारीपासून उपलब्ध होणार आहे. शाळेनं हे हॉल तिकीट प्रिंट करून विद्यार्थ्यांना देणं अपेक्षित असून, यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क लागणार नाही असं राज्य शिक्षण मंडळानं सूचित केलं आहे.
राज्य मंडळातर्फे दहावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत होणार आहे. दरम्यान, या परीक्षेसाठी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीनं विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट उपलब्ध असेल. लेखी परीक्षेपूर्वी दहावीच्या तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा 3 फेब्रुवारी के 20 फेब्रुवारी 2025 दरम्यान घेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
यंदाच्या वर्षी दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तारखा पाहता निकालही लवकर लागणार असल्याचं सूचक वक्तव्य राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केल्यामुळं निकाल साधारण 15 मेपर्यंत लागू होईल असं सांगण्यात येत आहे.