Maharashtra Wetaher News : हिमाचल प्रदेश, काश्मीर, उत्तराखंड इथं पर्वतीय क्षेत्रांवर बर्फाची चादर कायम असून, या भागांमध्ये प्रामुख्यानं काश्मीरच्या खोऱ्यात हिमवृष्टीचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, हिमाचलमध्येही पर्वतीय क्षेत्रापासून मैदानी भागापर्यंत थंडीचा कडाका कायम आहे. चंदीगढ, हरियाणा, दिल्ली या भागांमध्ये थंडीसह धुक्याची चादर दृश्यमानतेवरही परिणाम करताना दिसत आहे. या सर्व परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातून मात्र थंडी कुठं दडी मारताना दिसत आहे. तर, देशाच्या दक्षिणेकडे पावसाचं सावट स्पष्ट दिसत आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार यंदा अपेक्षित गारठा पडला नसून, सध्या राज्यावर पावसाळी ढगांचं सावट पाहायला मिळत आहे. परिणामी तग धरून राहिलेली थंडीसुद्धा आता नाहीशी होण्यास सुरुवात होताना दिसत आहे. पुढील 24 तासांमध्ये राज्यातील हवामानात फारसा बदल होणार नसून, तापमानात चढ- उतार अपेक्षित आहेत.
राज्यात किमान तापमानाचा आकडा 15 अंशांपलिकडे दिसत असून सध्या धुळ्यातील 12 अंशांवरील तापमान मात्र इथं अपवाद ठरत आहे. तर, रत्नागिरी इथं कमाल तापमान 34 अंशांवर पोहोचलं आहे. कोकण किनारपट्टी आणि मुंबई शहर, उपनगरांमध्ये वातावरणात धुरक्याचं प्रमाण अधिक राहणार असून, दिवसा उष्मा अधिक भासणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.