Saif Ali Khan Attack: "मुंबईतच नव्हे, तर संपूर्ण राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. वांद्र्यातील सर्वात सुरक्षित इमारतीत अभिनेता सैफ अली खान व त्याची पत्नी करिना कपूर राहतात. त्या इमारतीत एक व्यक्ती आरामात घुसते, अभिनेता सैफच्या घरात प्रवेश मिळवून सैफ व त्याच्या सहकाऱ्यांवर अंदाधुंद चाकूहल्ला करून पसार होते याचा अर्थ हल्लेखोर सैफ व त्याच्या कुटुंबीयांच्या ओळखीचाच होता. त्यामुळे सैफवरील हल्ला हा कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंधित आहे असे मानायचे काय याबाबत संभ्रम आहे. सैफवरील हल्ल्याने विरोधकांनी प्रश्न निर्माण केले व मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यावर थातूरमातूर उत्तर दिले. ‘पोलीस तपास करीत आहेत, आम्ही खोलात जाऊन तपास करू, कोणालाही सोडणार नाही, उगाच मुंबईला बदनाम करू नका,’ ही त्यांची उत्तरे आहेत. मुंबईसारख्या शहरात अशा घटना घडतात ही त्यांची एकंदरीत भूमिका आहे, पण मुंबईत अशा घटना रोजच घडू लागल्या आहेत व कायद्याची भीती कोणालाच राहिलेली नाही," असं 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे.
"बँक फ्रॉड व इतर गुन्ह्यांतला एक आरोपी फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर येतो व महायुतीचा विजय झाला म्हणून फडणवीस यांना उचलून खांद्यावर घेतो. फडणवीस त्यास पेढा भरवतात. हाच गुन्हेगार समाजमाध्यमांवरील एका सक्रिय गजाभाऊ नामक मराठी माणसाला उचलून नेण्याची भाषा करतो आणि फडणवीस काहीच घडले नाही अशा आविर्भावात वावरतात. बीडमध्ये मोक्का आरोपीच्या समर्थनार्थ लोक रस्त्यावर उतरतात, धमक्या देतात व त्या सरपंच देशमुख खुनाचे सूत्रधार मंत्रिमंडळात बसतात, हे चित्र कायद्याचा धाक राहावा असे नाही. त्यामुळे मुंबईत जे घडवले जात आहे ते महाराष्ट्राच्या प्रतिमेला शोभणारे नाही. बाबा सिद्दिकी यांचा मुंबईच्या रस्त्यावर खून झाला. बलात्कार, कोयता गँगने पुण्याचे जीवन भयभीत झाले. नागपुरात लैंगिक अत्याचाराची प्रकरणे वाढली. हे सर्व पाहून फडणवीस यांच्यातला गृहमंत्री जागा होत नाही काय?" असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं विचारला आहे.
"सैफ अली खानवरील रहस्यमय हल्ला मुंबईच्या विस्कळीत व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहे. सैफच्या बाबतीत जे घडले ते मुंबईतील चाळी, झोपडपट्ट्यांत रोजच घडते आहे, पण सैफ तैमूरचे वडील असल्याने या घटनेतील चाकू सगळ्यांच्या काळजात घुसला. 15 दिवसांपूर्वी सर्व कपूर मंडळी व त्यांचा जावई सैफ हे पंतप्रधान मोदी यांना भेटले, गप्पा झाल्या. मोदी यांनी चिरंजीव तैमूर याची खास चौकशी केली. मोदी यांना भेटून सैफ खूश होता, पण 15 दिवसांत सैफवर खुनी हल्ला झाला. पंतप्रधान आदल्या दिवशी मुंबईत होते व लगेच सैफ रक्ताच्या थारोळ्यात पडला. मुंबईच्या सिने जगतावर दहशत निर्माण करण्याचा कोणी प्रयत्न करतोय का? की सैफवर हल्ला हा व्यक्तिगत कारणातून झालाय. भाजपचे लोक सैफवर ‘लव्ह जिहाद’चा हल्ला करीत होतेच, पण पंतप्रधानांनीच सैफ, करिना व तैमूरला भरभरून आशीर्वाद दिल्याने ‘लव्ह जिहाद’चे रूपांतर मंगलमय परिणयात झाले व मंत्री आशीष शेलार हे स्वतः सैफला भेटून सर्व ठीकठाक करण्यासाठी रुग्णालयात गेले. कारण तैमूर व त्याच्या वडिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे," असा उल्लेख लेखात आहे.
"मुंबईत नेमके काय चालले आहे? मुंबई सुरक्षित आहे काय? की मुंबईची सुरक्षा राम भरोसे आहे हे एकदा लोकांना कळू द्या. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर संशय निर्माण होत आहे. पोलिसांच्या कार्यक्षमतेपेक्षा भाजपच्या जवळचा आहे काय, असे हेरून पोलीस दलात नेमणुका दिल्या जातात. त्यामुळे मुंबईचे साफ बारा वाजले. सैफ अली खानवरील हल्ल्याने कायदा आणि सुव्यवस्थेस किती हादरा बसला ते माहीत नाही, पण मुंबई सुरक्षित नाही यावर शिक्का बसला. मुंबईचा निम्म्याहून अर्धा पोलीस फोर्स हा गद्दार आमदार व त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनाती फौज म्हणून राखीव आहे. पुन्हा केंद्राचे ‘व्हीआयपी’ मंडळ रोजच मुंबईभेटीवर येत असल्याने पोलिसांवर ताण वाढतो. पोलिसांना रजा नाही, आराम नाही. त्यांची ओझ्याची गाढवे करून मुंबईचे रक्षण करा असे सांगणे बरोबर नाही. गृहमंत्री हे शहाणे आहेत व शहाण्यांकडून चांगल्या कामाची अपेक्षा ठेवता येईल," अस ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलंय.
"सैफ अलीवरचा हल्ला हे एक निमित्त आहे. यातून पोलिसांना स्वतःच्या कार्यपद्धतीत सुधारणा कराव्या लागतील. पोलिसांचे मनोधैर्य वाढवायचे असेल तर गृहमंत्र्यांनी स्वतःभोवतीचे राजकीय अंडरवर्ल्ड आधी दूर करायला हवे व मंत्री, आमदारांना (स्वपक्षीय) तशी सक्त ताकीद द्यायला हवी. सैफ हा कलाकार आहे. त्याचे वडील मन्सूर अली पतौडी हे भारतीय क्रिकेटची शान होते. आई शर्मिला टागोरही भारतीय सिनेमातले मोठे नाव. स्वतः सैफला भारत सरकारने ‘पद्म’ पुरस्काराने गौरवले. खुद्द पंतप्रधान मोदी त्याच्या प्रेमात आहेत. अशा सैफवर त्याच्या घरात घुसून चाकूहल्ला करणे धक्कादायक तितकेच रहस्यमय आहे. खुनी हल्ला करणारा सर्व सुरक्षा व्यवस्था भेदून घरात घुसला व नंतर पळून गेला आणि गायब झाला, हे अधिक सस्पेन्स वाढवणारे आहे. पोलिसांना हा सस्पेन्स संपवायचा आहे. दया, कुछ तो करो!