Wrestlers Protest : राजधानी दिल्लीत गेल्या महिन्यापासून सुरु असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोनलाची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरु आहे. पोलिसांनी हुसकावल्यानंतरही कुस्तीपटू अधिकच आक्रमक झालेत. दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात गुन्हा नोंदवून कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिबा दर्शवणारा फलक पुण्यात काँग्रेसकडून लावण्यात आला होता. मात्र, पुणे महापालिकेने शुक्रवारी रात्री काढला. यावेळी कार्यकर्त्यांनी याचा निषेध केला.
महिला कुस्तीपटूवर लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेल्या खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात लावण्यात आलेला फलक पुणे महापालिका कर्मचाऱ्यांनी काढला. पुण्याच्या खडकमाळ आळीमध्ये काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय बालगुडे यांनी हा फलक लावला होता. दिल्लीमध्ये सुरु असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवणारा हा फलक होता.
महिला कुस्तीपटूवर लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात लावण्यात आलेला फलक पुणे महापालिका कर्मचाऱ्यांनी काढला । यावेळी कार्यकर्त्यांनी चौकात ठिय्या आंदोलन करुन महापालिका तसेच पोलीस प्रशासनाचा निषेध केला#WrestlersProtest #WrestlersProtests #PuneNews pic.twitter.com/84dAMbSph4
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 3, 2023
मागील महिनाभरापासून लावण्यात आलेला हा फलक महापालिका कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत खाली उतरवण्यात आला. मात्र या कारवाईला काँग्रेस कार्यकर्त्यांनी विरोध केला. फलक काढून नेल्यानंतर कार्यकर्त्यांनी काही काळ येथील चौकात ठिय्या आंदोलन करुन महापालिका तसेच पोलीस प्रशासनाचा निषेध केला.
दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी सांगितले की, भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात महिला कुस्तीपटूंच्या तक्रारीची चौकशी केली जात आहे आणि तपास पूर्ण झाल्यानंतर कारवाई केली जाईल. आझमगड जिल्ह्यातील बुऱ्हाणपूर तालुक्यातील भैरोपूर गावात एका कौटुंबिक कार्यक्रमानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देत होते.
देशातील आघाडीच्या महिला कुस्तीपटू यांनी ब्रिजभूषण यांच्यावर गंभीर आरोप केलेत. अनेक महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेल्या शरण सिंहला अटक करण्याची मागणी करत आहेत. साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया आपल्या मागण्यांसाठी जंतरमंतरवर निदर्शने करत होते, मात्र रविवारी पोलिसांशी झालेल्या चकमकीनंतर त्यांनी जंतरमंतरहून माघार घेतली. नंतर त्यांनी आपले पदक गंगेत टाकण्याची घोषणा केली. परंतु खाप आणि शेतकरी नेत्यांच्या विनंतीनंतर त्यांनी तसे केले नाही.